Ratnagiri Uday Samant Sarkarnama
कोकण

Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सामंतांचे तगडे नियोजन; 130 बसगाड्या अन् गटनिहाय ३ हजार कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट!

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारी होणाऱ्या रत्नागिरी दौऱ्याची मोठी तयारी केल्याचे माहिती मिळत आहे. यासाठी २५ ते ३० हजार कार्यकर्त्यांची विक्रमी सभा घेण्याची तयारी असल्याचे समजत आहे. एसटीच्या जवळपास १३० बस बुक केल्या आहेत. मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय ३ हजार कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यांच्याही स्वतंत्र गाड्या असणार आहेत. उद्योगमंत्र्यासह भैया सामंत, शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी दिवसरात्र नियोजनामध्ये व्यस्त आहेत.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे-फडणवीस युती सरकार राज्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे प्रथमच रत्नागिरी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांचे हे होमपीच आहे. त्यामुळे अल्पावधीत शिंदे गटाने तालुक्यात आणि जिल्ह्यात चांगलीच मोट बांधली आहे. शिंदे गटाची ताकद आता दिसू लागली आहे. उदय सामंत यांची स्वतंत्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी आहे.

त्यात काही निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्याबरोबर आल्याने शिंदे गट अधिक मजबूत होताना दिसत आहे. गटाचे प्रणेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच रत्नागिरीत येत आहेत. त्यांचे जल्लोषात आणि राजकीय ताकदीने स्वागत करण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरात स्वच्छता सुरू आहे. प्रमोद महाजन क्रीडांगणावर सभा होणार असल्याने तो मार्ग चकाचक केला जात आहे. दुभाजक स्वच्छ करून त्यांना रंग दिले जात आहेत. शहराच्या प्रवेशद्वारापासून ते सभास्थळापर्यंत सर्वत्र बॅनर लावण्यात आले आहेत. भगवे झेंडे फडकवण्यात आले आहेत. स्वागत कमानी उभ्या राहिल्या आहेत.

पार्किंगची विशेष सोय :

रत्नागिरी मतदारसंघातील १० गटांतून सुमारे २५ ते ३० हजार कार्यकर्ते सभेला आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एसटीच्या सुमारे १३० ते १४० गाड्या आरक्षित केल्या आहेत. प्रत्येक गाडीमध्ये ५० ते ५५ व्यक्ती भरण्यात येणार आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणखी स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था केली आहे. निव्वळ एसटीतून येणारे कार्यकर्ते जवळपास ७ हजारांवर असणार आहेत. येणाऱ्या वाहनांना आठवडा बाजार येथील दोन्ही रिकाम्या जागा, रहाटाघरसमोरील जागा, ८० फुटी हायवेच्या बाजूला व अन्य ठिकाणी पार्किंगची सोय केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT