Vaibhav Khedekar, Raj Thackeray Sarkarnama
कोकण

सत्ता बदलल्याचे रामदास कदमांनी दाखवून दिले... खेडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Anil Parab यांना वैभव खेडेकर यांचा पाठिंबा असल्याचा कदम यांचा संशय होता..

सरकारनामा ब्यूरो

खेड : राज्यात सत्ताबदल होताच त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांच्या मनाप्रमाणे काही बाबी घडू लागल्या आहेत. रामदास कदम यांच्याविरोधात फोन टॅपिंग करण्यावरून खेडेकर यांच्याशी वाद घालणारे खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर अडचणीत आले आहेत.

शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना नगरसेवकानी केलेल्या तक्रारीनंतर घडलेल्या घडामोडी येथवर पोचल्या आहेत. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांच्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश 7 एप्रिल 2022ला दिले होते.

येथील पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी2020 ते 31 डिसेंबर 2020 या मुदतीत शासकीय निधीमधून त्यांच्या वाहनाला 5 लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे वापरून इंधन पुरवठा करत शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. खेड पोलिस ठाण्यात 30 जुलै 2022ला सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक व गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यासह सेनेच्या दहा नगरसेवकांनी केला होता.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी मुद्देसुत लेखी स्वरूपात केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करून खेडेकर यांना इंधन वापरासाठी पालिकेतून केलेल्या खर्चात अनियमितता केल्याबद्दल दोषी ठरवले होते. जिल्हाधिकारी यांनी नगरविकास विभागाचे अव्वर सचिव यांच्याकडे अहवाल दिल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांच्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश 7 एप्रिल 2022ला दिले होते. त्या आदेशानुसार खेड पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 409 व 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या 5 लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे एवढ्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सोनाली झेंडे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT