Nilesh Rane

 

Sarkarnama

कोकण

जिल्हा बँकेच्या विजयावर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया अन् नवीन वादाला निमंत्रण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयावर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजप (BJP) नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे आतापर्यंत 11 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 8 जागा मिळाल्या आहेत. या विजयावर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, त्यांच्या या प्रतिक्रियेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

निलेश राणे यांनी जिल्हा बँकेतील विजयानंतर ट्विट केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार आणि राऊत यांच्यावर त्यांनी आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला. कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नारायण राणे विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी निवडणूक झाली. शिवसेनेचे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपचेही अनेक नेते पराभूत झाले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख सतिश सावंत (Satish Savant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. अखेर राणेंना जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवले आहे

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला तर सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत. वैभव यांनीच विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा नाईक यांनी दिलेला आणखी एक धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बॅंक नसल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या आधी ते दोनदा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रिक केली आहे.

सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंचरच भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यामुळे सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले. ईश्वरचिठ्ठीवर अखेर भाजप उमेदवार विजयी झाल्याने राणेंना कणकवली बालेकिल्ल्यात अब्रू राखता आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT