चिपळूण : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या दापोली दौऱ्यावेळी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना केलेल्या आवाहनाची चर्चा सध्या रंगली आहे. भविष्यात आपल्याला एकत्र काम करायचे आहे. तुमचे कौतुक करायचे तेव्हा मी करणारच असून, भविष्यातही त्याच कुठे कमतरता ठेवणार नाही, असा जाहीर शब्द तटकरेंनी जाधवांना दिला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान भास्कर जाधव विरूद्ध सुनील तटकरे संघर्षाची धारही कमी झाल्याचे दिसून आले. जाधव हे राष्ट्रवादीत असताना कोकणच्या नेतेपदावरून तटकरे आणि त्यांच्यात नेहमी स्पर्धा असायची. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये दोघांनी मंत्री म्हणून तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. दोघांमध्ये त्यावेळी उघड संघर्ष होता. अखेर 2019 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी जाधव यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे होती. प्रत्यक्षात मात्र, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे हा संघर्ष कमीकमी होत गेला.
काही दिवसांपूर्वी खासदार तटकरे यांनी आपला मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी खेड आणि दापोलीतील कुणबी समाजातील शिवसेना नेत्यांना राष्ट्रवादीत घेतले. त्यावेळी भास्कर जाधवांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याचे सत्र सुरू होते. आदित्य ठाकरे यांचा दापोली दौरा मात्र अपवाद होता. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत अंतर पडत असल्याचा मुद्दा दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी उपस्थित केला होता. त्यावर तटकरेंनी तुम्ही अंतर ठेवू नका. आम्हाला बोलवा आम्ही अवश्य येऊ,असा शब्द दिला होता.
भास्करराव भविष्यात आपल्याला एकत्र काम करायचे आहे. त्यामुळे मी तुमचे कौतुक करायचे तेव्हा करणारच आहे. तुमच्याबद्दल मी चांगले बोललो आहे. उगाच काही गैरसमज करून घेऊ नका. मुलगी आदितीसमोर मी तुम्हाला काहीतरी बोललो, असा गैरसमज करून घ्याल, असे तटकरे हे जाधवांना त्यावेळी म्हणाले होते. यानंतर जाधव यांच्यासह उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उसळली होते. यामुळे दापोलीतील कार्यक्रम हा तटकरे आणि जाधव यांच्यातील दिलजमाई करणारा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.