Ganesh Naik BJP Palghar Janta Darbar : भाजप मंत्री गणेश नाईक यांच्या पालघर इथल्या जनता दरबार गोंधळ झाला. जनता दरबार वाढवण बंदर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आठ ते दहा जणांच्या शिष्टमंडळात, दोन युवक आणि दोन युवती वाढवण बंदर रद्द करा, अशा घोषणा लिहिलेले काळे कपडे परिधान करून आले होते.
या युवक-युवतींना जनता दरबार भरलेल्या ठिकाणच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. शिष्टमंडळातील काही युवकांनी अंगातील शर्ट काढल्यानंतर अधिकच गोंधळ उडाला. बंदोबस्तावरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर शिष्टमंडळातील युवक शांत झाले. पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन बंदर रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
भाजप मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांचा पालघर इथं सहावा जनता दरबार झाला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात, हा जनता दरबार झाला. मंत्री नाईक यांच्या दरबारात जवळपास 480 पेक्षा जास्त तक्रार अर्ज दाखल झाले होते. तक्रारदारांनी प्रशासकीय विभागाशी अनेक तक्रारी केल्या. या तक्रारी ऐकून झाल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर मंत्री नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
जनता दरबारामध्ये मालकी जमिनीवर अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला होता. काही जण शस्त्रधारी खासगी सुरक्षा रक्षक सोबत ठेवून जमीनमालकांना दमदाटी करून हे अतिक्रमण करत असल्याचे समोर आले. मात्र, ही दादागिरी आणि गुंडगिरी चालणार नाही. जे शस्त्रधारी सुरक्षा रक्षक आहेत, त्यांचे परवाने नियमानुसार तपासा अन्यथा कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी पोलिस (Police) विभागाला दिले.
बांधकाम विकसक गुंडगिरी करून, दबाव आणून सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पालकमंत्री नाईक यांच्यासमोर आल्यानंतर कोणतीही तमा न करता सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी सुरक्षा यंत्रणांना केले. यंत्रणेतील अधिकारी हे लोकसेवक असून, त्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पैसे नसल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार नाकारल्याची बाब पालकमंत्री यांच्यासमोर आल्यानंतर पैशाअभावी रुग्णांना खासगी दवाखाने उपचार देत नसतील, तर या दवाखान्यांनी अशा उपेक्षितांना थांबवू नये. डिपॉझिटविना त्यांना उपचार देणे आवश्यक असल्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला केले, तर अशा उपेक्षितांसाठी एक स्वतंत्र सामाजिक उत्तरदायित्व खाते तयार करून त्यामार्फत त्यांना मदत निधी देण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या.
या मदत निधी खात्यात मी स्वतः काही निधी सहाय्य निधी म्हणून देत असल्याचे त्यांनी सांगितले. वाडा तालुक्यातील प्रदूषण करणाऱ्या टायर कंपन्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली. नागरिकांना त्रास होत असल्यास तक्रारीचे तथ्य तपासून वेळ पडली तर कंपनी बंद करा, अशा सूचना पालकमंत्री नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.