New District in Goa : देशातील सर्वात छोटे राज्य म्हणून महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्याची ओळख आहे. आतापर्यंत या गोवा राज्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन जिल्हे होते. पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता राज्यात तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची घोषणा केली आहे. जिल्हा निर्मितीच्या घोषणेसोबतच नवीन जिल्ह्याचे नावही त्यांनी जाहीर केले आहे.
गोव्यात मागील अनेक दिवसांपासून नवीन जिल्हा निर्माण होणार याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. त्यासाठी समिती स्थापन करून शासनाने अहवालही मागविला होता. अशात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अचानक जिल्हा निर्मितीची अधिकृत घोषणा केली. गोव्यातील पुरातन भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या कुशावती नदीच्या नावावरून नवीन जिल्ह्याला कुशावती नाव देण्यात येणार आहे.
धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या 4 तालुक्यांचा आणि एकूण 115 गावांचा नवीन जिल्ह्यात समावेश असणार आहे. या नव्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असणार आहे. तूर्त प्रशासकीय इमारती, कार्यालये, मनुष्यबळाची व्यवस्था होईपर्यंत मडगाव येथील साल्ढाणा प्रशासकीय संकुलातील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातूनच नव्या जिल्ह्याच्या कारभार चालणार आहे.
31 डिसेंबरपूर्वी निर्णय घेण्याचे होते बंधन :
गोवा सरकारवर 31 डिसेंबर 2025 रोजी नवीन जिल्हा निर्मितीच्या निर्णयाचे बंधन होते. 1 जानेवारी 2026 ते मार्च 2027 पर्यंत जनगणनेमुळे जिल्ह्यांच्या सीमा बदलण्यास केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत. तसेच फेब्रुवारी 2027 मध्ये विधानसभा निवडणूक नियोजित आहे. त्यामुळे गोवा सरकारने 31 डिसेंबर रोजी तडकाफडकी नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा केली आहे.
आदिवासी बांधवांसाठी फायदेशीर :
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "देशातील आकांक्षित जिल्ह्यांना केंद्र सरकारकडून अतिरिक्त 15 कोटी रुपये मिळतात. त्यामुळे 27 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या नवीन जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची विनंती करता येईल." त्यामुळे नवीन जिल्ह्याचा आदिवासी बांधवासांठी फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.