Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

शब्द पाळण्यासाठी टोकाची भूमिका घेत पक्षातील सहकाऱ्यांचा वाईटपणा घेतला

सरकारनामा ब्यूरो

गुहागर : ‘‘साखरीआगर जेटीच्या प्रलंबित कामासाठी आमच्याच सरकारमधील मंत्र्याला उलटसुलट प्रश्न विचारून भांडावून सोडले. अखेर नव्याने आठ कोटींचा निधी मंजूर झाला. दिलेला शब्द पाळण्यासाठी मी टोकाची भूमिका घेतो; म्हणून मला पक्षांतर्गत सहकाऱ्यांकडून वाईटपणा घ्यावा लागला,’’ असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केले. (I took extreme Role to keep my word to the people : Bhaskar Jadhav)

साखरीआगर अंजनवाडी येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची सभागृहाची मागणी होती. आमदार जाधव यांनी या सभागृहासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला. या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. १९ एप्रिल) आमदार जाधव यांनी केले. या वेळी अंजनवाडीतील सर्व ग्रामस्थांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला.

या कार्यक्रमात बोलताना एक ग्रामस्थ म्हणाले की, गेली पंधरा वर्षे समाज, गाव, वाडीचा विरोध पत्करत आम्ही एकाच नेत्याच्या बाजूने राहिलो. मात्र, त्यांनी आमचे काम केले नाही. हाच धागा पकडत आमदार जाधव म्हणाले, या तालुक्यात सर्वात जास्त वजन भाजपचे होते. पण, आता भाजपची बहुतांशी मंडळी आमच्यामागे उभी राहात आहेत. कारण आम्ही विकास करतो, हा विश्वास जनतेमध्ये आहे.

गुहागर तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थाने विकासाची जाणीव आहे. विकासाबद्दल आस्था आणि प्रेम मतांच्या रूपाने परतफेड करण्याची वृत्ती गुहागरकरांमध्ये आहे. म्हणूनच दिलेला शब्द पूर्ण करण्याकरिता कितीही टोकाची भूमिका घेतो. याच पद्धतीप्रमाणे तुमच्या सभागृहाचे काम मंजूर केले. आपण सर्वजण कायम माझ्या पाठीशी उभे राहावे. तुमची विकासकामे करून घ्यावीत.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, विनायक मुळे, उपसभापती सीताराम ठोंबरे, युवासेनेचे सचिन जाधव आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT