Swapnali Sawant
Swapnali Sawant sarkarnama
कोकण

स्वप्नाली सावंतांचा खून करण्यासाठी वर्षभरापासून होते आरोपींचे प्लॅनिंग

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : माजी नगराध्यक्षा स्वप्नाली सावंत यांचा मृतदेह जाळल्यानंतर राख गडबडीत गोणीत भरणे संशयित आरोपींना महागात पडले. पोलिसांनी (Police) सुतावरून स्वर्ग गाठत ३ दिवसांत या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. मृतदेहाची ६ ते ८ हाडे आणि कुजलेले मांस पोलिसांना सापडले. ते फॉरेन्सिक लॅबला तपासण्यासाठी पाठविण्यात आले. १ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता दोरीने गळा आवळून स्वप्नाली सावंत यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह लपवून ठेवून रात्री पेंढा आणि पेट्रोलच्या साह्याने जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी ती राख समुद्रात टाकल्याची कबुली तिन्ही संशयित आरोपींनी दिली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 'स्वप्नाली सुकांत सावंत (Swapnali Sawant) या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा पती सुकांत गजानन सावंत यांनी २ सप्टेंबरला दिली होती. सावंत पती-पत्नीमध्ये खूप वर्षांपासून कौटुंबिक वाद होते. याबाबत पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रारी देखील दाखल आहे. स्वप्नाली सावंत यांच्याबद्दल यापूर्वीही बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. पती-पत्नीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नालीचा घातपात झाला असावा, अशी तक्रार स्वप्नाली सावंत यांची आई संगीता शिर्के यांनी ११ सप्टेंबरला दिली.

स्वप्नालीचा पती सुकांत सावंत, रूपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग या तिघांनी मिळून स्वप्नालीला ठार मारल्याचे सुकांत सावंत याने स्वतः आपल्याला सांगितल्याची लेखी तक्रार त्यांनी दिली होती. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाला दिशा दिली. अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ७ तपास पथके तयार करण्यात आली होती.

गुन्ह्यातील ठोस पुरावे शोधून काढण्याबाबत वेगवेगळी उद्दिष्टेने त्यांनी तपास केला. संशयित सुकांत वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत होता. वर्षभर खुनाचा कट रचून सर्व पुरावे नष्ट करण्याचे नियोजन त्याने केले होते. त्याप्रमाणे सर्व घडत गेले. एक चूक त्यांना महागात पडली आणि त्यांचा कट उघड झाला. पोलिसांना मृतदेह जाळलेल्या ठिकाणी ६ ते ८ मानवी हाडे सापडली. बाजूलाच कुजलेल्या अवस्थेत मांस मिळाले. यावरून तिथे खून झाल्याचे निष्पन्न झाले. संशयितांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर खुनाची कबुली दिली.

सुकांत सावंत, त्याचे साथीदार रूपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग यांनी पूर्वनियोजनाने १ सप्टेंबरला स्वप्नाली सावंत यांचा मिऱ्याबंदर येथील घरी दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पेंढ्यामध्ये झाकून ठेवला. अंधार पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घराच्या आवारातच पेंढा व पेट्रोलने जाळून टाकला. जाळल्यानंतर उरलेली राख २० बॅगांमध्ये भरून ती समुद्रात टाकून दिली.

मृतदेह जाळला त्या जागेची साफसफाई केल्याचे निदर्शनास आले आहे. गडबडीत घमेल्याने राख भरताना त्यातील काही हाडे व मांस तिथेच पडले. गुन्ह्याशी संबंधित असलेले भौतिक पुरावे शोधून ते तज्ज्ञांच्या मदतीने गुन्ह्याच्या तपासकामी जप्त केले. डीवायएसपी सदाशिव वाघमारे, शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक निरीक्षक भोसले, गुन्हेशाखेचे शहा, स्वामी, राजापूर, पूर्णगड पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांपुढे गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी तीन दिवसांत गुन्हा उघड केला. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिसांनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांना रिवॉर्ड जाहीर केला आहे.

मोबाईल शोधण्यातही यश

संशयिताने कोणाच्या सल्ल्याने हा कट रचला, त्यांच्या संपर्कात कोण-कोण होते. त्यासाठी कोणाची मदत झाली, हे सर्व तपासले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत स्वप्नाली सावंत यांचा मोबाईलही शोधण्यात पोलिसांना यश आले. यावरून खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणखी काही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT