Congress Crisis sarkarnama
कोकण

Congress Crisis : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर : बड्या नेत्यावर अल्पसंख्यक सेल अध्यक्षासह महिला नेत्याचे गंभीर आरोप

Kalyan Dombivli Congress Crisis After Sameena Sheikh Makes Allegations Against Sanjay Dutt : कल्याण डोंबिवली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून काँग्रेस अल्पसंख्यक सेल अध्यक्ष सलीम शेख आणि नगरसेविका समीना शेख यांनी काँग्रेस नेते संजय दत्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Aslam Shanedivan

kalyan Dombivli News : कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यानच गटनेत्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. या घटनेची चर्चा अद्याप कमी झालेली नसतानाच आता डोंबिवलीतील काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. काँग्रेस अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सलीम शेख आणि नगरसेविका समीना शेख यांनी काँग्रेस नेते संजय दत्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच काँग्रेस नेते संजय दत्त यांनी कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेस संपवल्याचा आरोप समीना शेख यांनी केला आहे. यामुळे काँग्रेस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दोन-एक महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाला होता. येथे बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवरून काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये वाद झाला. या वादात जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी गटनेत्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांना कथितरित्या शिवीगाळ केली. तर संतापलेल्या कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष पातकर यांना कानशिलात लगावली. या घटनेनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते.

अद्याप या घटनेची चर्चा कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला. कल्याण काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सलीम शेख आणि त्यांची मुलगी तसेच केडीएमसीच्या नगरसेविका समीना शेख यांनी काँग्रेस नेते संजय दत्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते संजय दत्त यांनी कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेस संपवल्याचा आरोप समीना शेख यांनी केला आहे.

सलीम शेख कल्याण काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आहेत. सलीम शेख यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते संजय दत्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2005 साली केडीएमसीमध्ये काँग्रेसचे 21 नगरसेवक होते, मात्र आता पक्षाचे केवळ दोनच नगरसेवक उरले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेस संपवण्याचे काम संजय दत्त यांनी केले. गेल्या बारा वर्षांत त्यांनी केवळ आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांनाच पदे दिली. निवडणुकीत आमच्या विरोधात काम केले आणि कोणत्याही समितीवर माझ्या मुलीला स्थान दिले नाही, असा आरोप त्यांनी केला.

2026 च्या केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले. कांचन कुलकर्णी आणि समीना शेख हे दोघेही मुस्लिमबहुल प्रभागातून निवडून आले आहेत. काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नवीन सिंह यांनी आयोजित केलेल्या अनेक आंदोलनांमध्ये केडीएमसी काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी सहभाग घेतलेला नसल्याची चर्चा जोरात असल्याने, पक्षातील अंतर्गत मतभेद अधिकच स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.

सलीम शेख आणि त्यांची नगरसेविका मुलगी समीना शेख यांनी केलेल्या आरोपांमुळे कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेसच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या आरोपांवर काँग्रेस नेते संजय दत्त आणि त्यांच्या समर्थकांकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT