Eknath Shinde sarkarnama
कोकण

Dam Project : धरण प्रकल्पांवरून राजकीय संघर्ष? शिंदेंच्या आमदारानं वात पेटवली; आता हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधणार

Shivsena MLA Mahendra Thorve Opposes Karjat Dam Project : कर्जतमधील प्रस्तावित शिलार आणि पोशीर धरणाला स्थानिकांसह शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोध केला आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित शिळार आणि पोशीर धरण प्रकल्पांवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांना स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून विरोध होत असताना, शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या जमिनी जाण्याची आणि त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन सादर केले असून, आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

राजकीय वातावरण तापले

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील प्रस्तावित शिळार आणि पोशीर धरण प्रकल्पांसह टोरंट प्रकल्पावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले होते. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर घारे यांनीही प्रत्युत्तर दिले होते.

आता कर्जत तालुक्यातील शिळार आणि पोशीर धरण प्रकल्पांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी या प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त केली असून, आमदार महेंद्र थोरवे यांनीही प्रकल्पांना विरोध दर्शवला आहे.

जमिनी जाण्याची भीती

प्रस्तावित धरण प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होण्याची आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे अस्तित्व, त्यांच्या जमिनी आणि भावी पिढ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये, अशी भूमिका थोरवे यांनी मांडली आहे.

पोश्री नदीवर प्रस्तावित असलेल्या पोशीर धरणाला स्थानिकांचा विरोध असल्यास आपणही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासन त्यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिले. तसेच स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करून या दोन्ही प्रकल्पांबाबत शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने आमदार महेंद्र थोरवे यांनी यापूर्वी या धरणांच्या उभारणीला पाठिंबा दिला होता. मात्र, सध्या स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांकडून या प्रकल्पांना विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

काही दिवसांपूर्वी शेतकरी आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी थोरवे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन शिळार आणि पोशीर धरण प्रकल्प रद्द करण्याबाबत निवेदन सादर केले. या दोन्ही प्रकल्पांबाबत शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधणार

शिळार आणि पोशीर धरण प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे महेंद्र थोरवे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनासही हा विषय आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हक्कांसाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही धरण प्रकल्पांबाबत शासन काय भूमिका घेते, याकडे कर्जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT