Kokan Ganeshotsav News : राज्यभरातील कंत्राटदारांची तब्बल ८६ हजार कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे अडकल्याने कंत्राटदार हवाल दिल झाले होते. अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. तर दीड ते दोन वर्षांपासून रखडलेल्या देयकामुळे सहा कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या होत्या. यामुळे राज्यातील कंत्राटदारांचा प्रश्न गंभीर झाला होता. अशातच रत्नागिरीतील कंत्राटदारांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तब्बल १० कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी आणि चिपळूण विभागासाठी देण्यात आला आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर प्रमुख रस्त्यांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राज्यभरातील कंत्राटदारांची देयके शासन दरवारी रखडली होती. ज्यामुळे सहा कंत्राटदारांना टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवावे लागले होते. ज्यानंतर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागेल, असा इशारा दिला होता. तर वेळोवेळी आंदोलनही केले होते.
कंत्राटदारांना थकबाकीपैकी किमान ५० टक्के रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. तर सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील देखील सुमारे १०० कोटीची बिले थकली होती. ज्यावरून ठेकेदारांनी एकदा बिलांसाठी आंदोलन केले होते. तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांना कंत्राटदारांनी निवेदन दिले होते.
दरम्यान गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणातील ठेकेदारवर्ग आणि चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तब्बल १० कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी आणि चिपळूण विभागासाठी प्राप्त झाला आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कामांच्या बिलांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
उत्सवाच्या काही दिवसांआधीच शासनाने तिजोरीचे तोंड उघडल्याने ठेकेदारवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण आहे. यंदाच्या गणेशोत्सवात लाखो चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हामार्गांवर वाहनांचा प्रचंड ताण असणार आहे. हाच ताण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या तातडीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी या निधीची तरतूद केली आहे. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
रत्नागिरी आणि चिपळूण या दोन्ही प्रमुख विभागांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निधीमुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि डागडुजीची कामे युद्धपातळीवर पूर्ण होऊन गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या नागरिकांना सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.