Ratnagiri News : विधान परिषदेच्या प्रस्तावित निवडणुकांचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (ता. १) शेवटचा दिवस आहे. मात्र यापूर्वीच कोकणात महायुतीत वादाची ठिणगी पडली असून शिवसेनेतून मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी आग्रही आहेत. दळवी यांच्या कन्येने तर अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल करत तटकरेंना विरोध असेल असे स्पष्ट केलं आहे. तर विकास गोगावले सोमवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांनी एकनाथ शिंदेंचे आशीर्वाद घेतले. यावेळी वडील खासदार सुनील तटकरे देखील हजर होते. यामुळेच ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकीकडे या जागेवरून तटकरे यांनी शिंदेंचे आशीर्वाद घेत मैदान मारण्याचा निर्धार केला असतानाच रत्नागिरीत मात्र वेगळीच डाळ शिजत असल्याचे उघड झाले आहे. येथे शिंदेंचे विश्वासू उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून गोगावले किंवा दळवी यांच्या मुलांच्या नावाला खो देणारे वक्तव्य झाले आहे. त्यांच्याकडून या जागेसाठी आता तिसरेच नाव पुढे केले जात आहे.
यामुळे आता शिवसेनेत नेमका कोणाचा आशार्वाद महत्वाचा आहे अशी चर्चा रंगली आहे. एकीकडे शिंदे यांनी अनिकेत यांच्या खांद्यावर हात ठेऊन तटकरेंना पाठींबा असल्याचा मेसेज शिवसेनेला दिला आहे. पण सामंत यांनी ऐनवेळी माजी आमदार व शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण हे शिवसेनेचे विधान परिषदेसाठी उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. यामुळे आता शिवसेनेतच नेमकं काय सुरू आहे अशी विचारणा सर्व सामान्य करताना दिसत आहेत.
उदय सामंत यांनी, सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मतदार यादी पुनःसर्वेक्षण कार्यक्रम संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हॉटेल अतिथी येथे बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, विधान परिषदेच्या प्रस्तावित निवडणुकांमध्ये कोकणची जागा शिवसेनला मिळाल्यास माजी आमदार व शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण हे उमेदवार असतील.
विधान परिषदेच्या निवडणुकीत कोकण विभागातून जर सेनेच्या वाट्याला जागा आली तर माजी आमदार चव्हाण यांना सेनेकडून उमेदवारी दिली जाईल. चव्हाण हे पहिल्यापासून इच्छुक असून राजन साळवीदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दोघेही संघटनेसाठी चांगले काम करत आहेत.
पण चव्हाण यांना उमेदवारी मिळावी यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आग्रह धरला जात असून तसा जोर देखील लावला जात आहे. यासाठी आपण स्वतः पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रह केला आहे. मात्र, कोकणची जागा महायुतीमधील कोणत्या पक्षाला जाते हे स्पष्ट लवकरच होईल, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.