Konkan Water Crisis Sarkarnama
कोकण

Konkan Water Crisis: निवडणुकीपुरतेच पुसले जातात पाण्यासाठीचे अश्रू ; कोकणावर पाणी कोपले

Water Scarcity in Konkan A Recurring Summer Crisis:विविध योजनांवर करोडो रुपये खर्च केले जातात. कित्येक धरणांचे काम वर्षानुवर्षे सुरूच आहे. असे असूनही पाण्याची तहान दरवर्षी घसा कोरडा करतच आहे.

शिवप्रसाद देसाई

कोकणाने तीस वर्षांत नळ योजना, धरणे, बंधारे यांवर खर्चाची कोटी-कोटींची उड्डाणे अनुभवली. यात ठेकेदारांसह प्रशासनातील ‘झारीतले शुक्राचार्य’, राजकारण्यांची चांदी झाली; पण विक्रमी पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या चटक्यांबरोबर टँकरने पाणी पुरवण्याची वेळ कोकणात दरवर्षी चढत्या क्रमानेच राहिली.

पैशात मोजल्या जाणाऱ्‍या पाणी योजनांच्या नियोजनशून्य आखणीमुळे मूळ जलसंस्कृती मोडीत काढली गेली. भौगोलिक स्थितीचा विचार करून जलसंधारणासाठी स्वतंत्र नीती ठरवली जात नाही आणि त्यावर प्रामाणिक अंमल करेपर्यंत कोकणावर पाणी कोपलेलेच राहणार आहे.

कोकण म्हणजे पावसाचा प्रांत. जून उजाडला की पुढचे तीन-चार महिने झोडून पडणाऱ्‍या जलधारांनी हा भाग पाणीदार होऊन जातो. अलिकडे हवामान बदलांच्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण बदलले आहे; मात्र सरासरी बऱ्‍यापैकी कायम आहे. तरीही मार्च उजाडला की इथल्या अनेक दुर्गम वाड्यांवर टँकरची चाहूल लागते. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टंचाई आराखडे तयार होतात. विविध योजनांवर करोडो रुपये खर्च केले जातात. कित्येक धरणांचे काम वर्षानुवर्षे सुरूच आहे. असे असूनही पाण्याची तहान दरवर्षी घसा कोरडा करतच आहे.

उन्हाळ्यातील टंचाई नित्याची

कोकणातील पाण्याची ही तहान समजून घेण्यासाठी आधी जिल्हावार वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. सिंधुदुर्ग काही वर्षापूर्वी टँकरमुक्त म्हणून जाहीर करण्यात आला. यामुळे इथल्या वाड्या-वस्त्या कितीही तहानल्या, तरी प्रशासन टँकर सुरू करत नाही. प्रत्यक्षातील परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे. प्रशासनाच्या यंदाच्या टंचाई आराखड्यात बारा गावांतील ३०२ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वणवण सुरू आहे. शहरी भागातही मार्च उजाडताच पाण्याची कपात सुरू होते. डोंगर कपारीत वसलेल्या धनगरवाड्या, उंचावरची गावांचे पाण्यासाठीचे अश्रू निवडणुकीपुरतेच पुसले जातात.

रत्नागिरीत सुमारे शंभर वाड्या दरवर्षी टँकरच्या प्रतीक्षेत असतात. उंचावरची गावे काही धनगर वस्त्यांवर पाणी साठवण क्षमताच नसल्याने त्यांची तहान राम भरोसे असते. समुद्राला खेटून असलेल्या काही गावांमध्ये पाणी योजना पोहोचलेल्या नाहीत. या जिल्ह्यातील २० ते २५ वाड्यांवर उन्हाळ्यात स्थलांतराची वेळ येते. याची तीव्रता खेड तालुक्यात अधिक आहे. तुलनेत मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील स्थिती अधिक गंभीर आहे. या ठिकाणी औद्योगिक वापरासाठी पाण्याची गरज जास्त असते. तेथे २० गावांतील १०३ वाड्यांवर टँकरने पाणी पुरवले जात आहे.

अनेक धरणे नावापुरती

या तिन्ही जिल्ह्यांत सिंचनाची स्थिती सारखीच आहे. या प्रांतात छोटी-मोठी दीडशे धरणे आहेत. कित्येक धरणांची कामे वर्षानुवर्षे सुरूच आहेत. असे असूनही पूर्ण झालेल्या धरणांच्या क्षमतेच्या जेमतेम दहा टक्के पाण्याचाच सिंचनासाठी उपयोग होतो. अनेक धरणे विनावापर पडून आहेत. कित्येक ठिकाणी धरणे पूर्ण होऊनही ते पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी कालवेच नाहीत. काही भागात गरज नसतानाही कोणाच्या तरी हितसंबंधासाठी धरणांची उभारणी झाली आहे.

जलसंस्कृतीचा वारसा

कोकणातील समस्येवर उत्तर शोधण्यासाठी येथील भौगोलिक स्थिती व जलसंस्कृती समजून घ्यायला हवी. पूर्ण कोकणात सह्याद्रीच्या रांगांपासून समुद्रापर्यंतचे अंतर जेमतेम ६० ते ८० किलोमीटर आहे. इतर भागांप्रमाणे कोकणातही नद्या हाच पाण्याचा मुख्य स्रोत आहे; मात्र नद्यांची रचना वेगळी आहे. नद्या प्रामुख्याने बाल्यावस्था अर्थात उगम, युवावस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्धावस्था अशा चार अवस्थांमधून वाहतात. कोकणात नद्यांचे उगम सह्याद्रीच्या रांगांमध्ये आणि संगम अरबी समुद्रात अशी सर्वसाधारण रचना आहे. आंबोलीतील हिरण्यकेशीसारख्या नद्या याला अपवाद आहे. सह्याद्री ते समुद्र हे अंतर कमी लांबीचे आणि तीव्र उताराचे असल्याने येथे बहुसंख्य नद्या युवावस्थेतच समुद्रात विलीन होतात. या अवस्थेत नद्यांचा प्रवाह अवखळ आणि वेगवान असतो. अशा स्थितीत जलसंधारणासाठी पाणी अडवणे सोपे नसते. असा बलपूर्वक प्रयत्न झाल्यास त्याच्या फायद्यापेक्षा नद्यांच्या रौद्ररूपाचा फटकाच जास्त बसतो. कोकणातील शेकडो वर्षाच्या कृषी परंपरेत अनुभवातून एक वेगळी जलसंस्कृती तयार झाली होती. यात या अवखळ नद्यांशी मैत्री करून पाणी अडवले जायचे आणि त्यातून येथील वाड्या वस्त्यांवर समृद्धी फुलायची.

यासाठी कच्चे वळण बंधारे बांधले जात असत. प्रत्येक गावात कुठे बंधारा घालायचा, याच्या जागा ठरलेल्या असायच्या. पावसाळा संपला की श्रमदानातून माती, लाकूड, झाडाच्या फांद्यांची एकत्र मोट बांधून तयार केलेली कवळे आदी नैसर्गिक साधनांचा वापर करत बांध घातला जायचा. उन्हाळ्याचे चटके वाढू लागले आणि पावसाची चाहूल लागली की हे बांध फोडले जायचे. मग खालच्या नदी पात्रात कमी झालेली पाणी पातळी पाऊस येईपर्यंत पुन्हा स्थिर व्हायची.

बदलांमुळे पाणी थांबेना

नद्यांमध्ये मोठमोठे डोह असायचे. त्यात साठलेल्या पाण्यांमुळे विहिरींची पाणी पातळी टिकून रहायची. त्या काळात विहिरींची संख्याही मर्यादित होती. नद्यांच्या कुशीतच वसलेल्या झरी, डोंगर कपारीतून ओघळणारे बारमाही झरे हे पिण्याच्या पाण्याचे स्रोत असायचे. या सगळ्यांमुळे अगदी मे महिन्यातही कोकणातल्या नद्या तुडुंब असायच्या. साधारणतः १९९०च्या दशकात नळयोजना, धरणांचे लोण आले. या योजना राबवताना त्याच्या जागा आणि उपयुक्तता याचा फारसा विचार झाला नाही. राजकारणात सक्रिय असणाऱ्या ठेकेदारांनी सोयीनुसार सरकारी बाबूंना हाताशी धरून नियोजनशून्य योजना कागदावर आणल्या. यातून करोडो रुपये खर्ची पडले. प्रत्यक्ष योजना मात्र अपयशी ठरल्या. लोकांना नळाने घरापर्यंत येणाऱ्‍या पाण्याची सवय झाली आणि पिढ्यान् पिढ्या जपलेले पाणवठेही इतिहासजमा झाले.

याच काळात पाण्याचे पंप सहज उपलब्ध व्हायला लागले. विंधन विहिरी (बोअरवेल) गावपाड्यापर्यंत पोहोचल्या. त्यामुळे श्रमदानातून कच्चे बंधारे उभारण्याची पद्धत संपून गेली. साहजिकच पाण्याचा मूळ स्रोत असलेल्या नद्या एप्रिल-मेमध्ये कोरड्या पडू लागल्या. याच काळात डोंगर रांगावर बेसुमार वृक्षतोड झाली. त्यामुळे पावसात डोंगरातल्या मातीचा गाळ तळाशी असलेल्या नद्यांमध्ये साठू लागला. यातून मोठ-मोठे डोह गाळाने भरले. साहजिकच नैसर्गिकरित्या होणारा जलसंचय बंद झाला.

हे नवे बदल केवळ मूळ जलसंस्कृती उद्ध्वस्त करेपर्यंत थांबले नाहीत. तेथे जलसंधारणाची नवी पद्धत आणली. यात जागा मिळेल तिथे कोल्हापूर टाइप अर्थात केटीवेअर बंधारे उभारले जाऊ लागले. यात काँक्रिटचे खांब नदीपात्रात बांधण्यात आले. पाणी अडवताना मध्ये लाकडी किंवा लोखंडी फळ्या टाकल्या जातात, पण खांब नदीपात्रातच असल्याने त्याला अडकून नद्यांमधला गाळ वाढू लागला. कोकणच्या मूळ जलसंस्कृतीचा विचार न करता निसर्गाच्या आणि भौगोलिक स्थितीच्या विरोधात जाऊन आणलेल्या पाणीयोजना इथल्या टंचाईच्या मुळाशी आहेत. कोकणासाठी स्वतंत्र जलनीती बनवली तरच येथील पाणी प्रश्‍न सुटणार आहे. दुर्दैवाने तसा विचार होताना दिसत नाही.

अशी होती संस्कृती

कोकणात पूर्वी पाण्याचे स्रोत देवाधर्माच्या नावाने जपले जायचे. तेथील स्वच्छता, पावित्र्य राखले जात असे. जलसंचयासाठी शेकडो छोटेमोठे तलाव होते. आता यातील बहुसंख्य तलाव एक तर बुजून गेले किंवा कायमचे कोरडे पडले. अनेक ठिकाणी डोंगरावरील पाण्याचे झरे अडवून ते मातीच्या कुंडांमध्ये साठवत त्याचा शेतीला वापर व्हायचा. ही संस्कृती सह्याद्रीच्या रांगामधील असनिये, झोळंबे अशा काही गावांनी आजही जपली आहे. असनिये येथे तर एकही विहीर नाही. तरीही ओहोळ, झरे, नद्या यामुळे हे गाव जलसमृद्ध आहे.

किनाऱ्यावरील दुखणे

कोकणात किनारपट्टी भागात उन्हाळ्यात मचुळ पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. पाणीपातळी जशी खाली जाते, तसे किनाऱ्‍यावरील विहिरींमध्ये खारे पाणी ओढले जाऊन ते पिण्यायोग्य राहत नाही. मालवणसह किनाऱ्यावरील अनेक शहरांतही हा प्रश्‍न भेडसावत आहे. विशेषतः ग्रामीण भागात याची तीव्रता जास्त असते.

कोकणचा पाणी प्रश्‍न सोडवणे फारसे कठीण नाही. येथे टंचाईसाठी नैसर्गिक कारणांपेक्षा इतर कारणे अधिक आहेत. साधारणतः ३० वर्षांपूर्वी मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना आम्ही लोकांचा सहभाग घेऊन कच्चे बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली होती. तलावांची दुरूस्ती केली होती. त्यामुळे पाणी पातळी वाढून जिल्हा टँकरमुक्त झाला होता. आताही लोकांचा सहभाग घेऊन पाणी वाचवण्याचे आणि साठवण्याचे प्रयोग केल्यास ८० ते ८५ टक्के प्रश्‍न निकाली निघेल.

— माधव भांडारी, कोकणातील पाणीप्रश्‍नाचे अभ्यासक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT