Raigad Political News : रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटताना दिसत आहे. आतापर्यंत मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्षाची चर्चा होती. आता आमदार महेंद्र दळवी विरुद्ध तटकरे असा नवा सामना रंगला आहे.
विकासकामांच्या श्रेयावरून महेंद्र दळवींनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आमच्यावर वारंवार टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ’, असा थेट इशाराच अनिकेत तटकरे यांनी दिला आहे. त्यामुळे रायगडमधील महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
रोह्यातील मुस्लिमबहुल भागातील एका शाळेच्या दुरुस्तीच्या कामावरून हा वाद सुरू झाला. आमदार महेंद्र दळवी यांनी या कामासाठी आपण निधी दिला होता, मात्र खासदार सुनील तटकरे यांनी त्याचे उद्घाटन केल्याचा आरोप केला.
दळवी म्हणाले की, विकासकामाचे उद्घाटन करताना संबंधित लोकप्रतिनिधींना निमंत्रण देणे अपेक्षित होते. मात्र, आपल्याला किंवा इतर संबंधितांना निमंत्रित करण्यात आले नाही. आपण निधी आणलेल्या कामाचे श्रेय तटकरे घेत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. तटकरे यांना दुसऱ्यांदा ‘सबुरीने घ्या’ असा सल्ला देत दळवींनी त्यांच्या निर्णय घेण्याच्या घाईवरही टीका केली. निधी आणणाऱ्या लोकप्रतिनिधींना किमान कामाची माहिती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महेंद्र दळवींनी विकासकामांच्या नियोजनावरूनही तटकरेंना लक्ष्य केले. एकाच कामावर दोन-तीन वेळा निधी टाकणे योग्य नाही, असा दावा त्यांनी केला. याशिवाय जिल्ह्यातील CSR निधीच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. रायगड जिल्ह्यातील CSR निधीचा मोठ्या प्रमाणात वापर केवळ रोह्यातच का केला जातो, असा सवाल दळवींनी उपस्थित केला.
दरम्यान, रोह्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ‘आमच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा विकासकामांसाठी वेळ द्या,’ असा सल्ला त्यांनी दळवींना दिला. आपल्या मतदारसंघातील जनतेची कामे करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही ते म्हणाले. अनिकेत तटकरे यांनी निवडणुकीच्या राजकारणाचा संदर्भ देत टीकाकारांवरही निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात वेगळी भूमिका आणि निवडणूक संपल्यानंतर वेगळी भूमिका घेतली जाते, असा टोला त्यांनी लगावला.
अनिकेत तटकरेंनी सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा संदर्भ देत, गेल्या ४० वर्षांत त्यांनी अनेक प्रकारच्या टीका सहन केल्याचे म्हटले. ‘आमचं काम हाथी चले बाजार...’ असे म्हणत त्यांनी टीकेकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका मांडली. मात्र, त्याचवेळी तटकरेंवर वारंवार टीका करणाऱ्यांना यापुढे ‘जशास तसे उत्तर’ दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रायगडमध्ये तटकरे विरुद्ध महायुतीतील शिवसेना हा संघर्ष नवा नाही. याआधी भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष अनेकदा समोर आला आहे. आता महेंद्र दळवी आणि तटकरे यांच्यातील शाब्दिक संघर्षाने त्यात आणखी एक भर पडली आहे. विकासकामांच्या श्रेयावरून सुरू झालेली ही जुंपण आगामी राजकीय समीकरणांपर्यंत पोहोचणार का? दळवींच्या टीकेला तटकरेंकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून आणखी किती तीव्र प्रत्युत्तर मिळणार? याकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.