Swapnali Sawant
Swapnali Sawant sarkarnama
कोकण

बेपत्ता माजी सभापती स्वप्नाली सावंतांची हत्या; पतीनेच काढला काटा?

सरकारनामा ब्यूरो

Swapnali Sawant : रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत (Swapnali Sawant) (वय ३५, रा. मिऱ्‍याबंदर, ता. रत्नागिरी) यांचा खून केल्याप्रकरणी त्यांचे पती व शिवसेनेचे (Shivsena) उपतालुका प्रमुख सुकांत ऊर्फ भाई गजानन सावंत (वय ४७, रा. सडामिया, जि. रत्नागिरी) यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी (Police) संशयित म्हणून अटक केली. कौटुंबिक वादातून हा खून केल्याचे पुढे आले आहे. या प्रकारामुळे राजकीय क्षेत्र मोठी खळबळ उडाली आहे. सुकांत सावंत यांची स्वप्नाली ही दुसरी पत्नी होती.

दोघांमध्ये अनेक महिने कौटुंबिक वाद सुरू होता. काहीवेळा त्यांच्यातील वाद पोलिस ठाण्यापर्यंतही पोहोचला होता. याला कंटाळूनच स्वप्नाली सावंत या मुलीसह भाट्ये येथे भाड्याने राहत होत्या. ३० ऑगस्टला गणेशोत्सवासाठी मिऱ्‍या येथील निवासस्थानी त्या आल्या होत्या. मात्र, स्वप्नाली मिऱ्‍याबंदर येथील घरातून निघून गेली व परत आली नाही, अशी तक्रार तिचे पती सावंत यांनी रत्नागिरी पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तिच्या घातपाताच्या संशयावरून तपास सुरू केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली यांची आई संगीता कृष्णा शिर्के (वय ६४, रा. तरवळ, ता. रत्नागिरी) यांनी ११ सप्टेंबरला रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संगीता शिर्के आणि तिच्या अन्य मुली मिऱ्‍या बंदर येथील स्वप्नाली सावंत यांच्या घरी गेल्या. तेथे सुकांत सावंत होता. त्याच्याशी झालेल्या वादात सुकांतने स्वप्नालीला ठार मारल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी सुकांत सावंत यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल केली. पत्नी बेपत्ताच झाली आहे, मुलाने तिला रत्नागिरीला सोडले होते. तेथून ती कुठे गेली माहीत नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी घटनास्थळाची पहाणी केली होती. त्यानंतर तपासाला अधिक वेग आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरिक्षक विनित चौधरी, सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज भोसले, प्रवीण स्वामी यांच्यासह अन्य अधिकारी, अंमलदार यांनी सुकांतची चौकशी सुरु केली. त्यामध्ये स्वप्नाली यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याप्रकरणी सुकांत सावंतसह, रूपेश ऊर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (वय ४३, रा. मिऱ्‍याबंदर, ता. रत्नागिरी), प्रमोद ऊर्फ पम्या बाळू गावणंग (वय ३३, रा. मिऱ्‍ बंदर, ता. रत्नागिरी) यांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत (ता. १९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. चौकशीत त्याने स्वप्नालीची हत्या करून बंगल्याच्या बाजूला तिचा मृतदेह जाळून नष्ट केल्याची कबुली दिली. आता पोलिस मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबतचा तपास सुरू आहे.

माजी सभापती स्वप्नाली सावंत यांना यापूर्वीही दोन वेळा पती सुकांत याने मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यातुन त्या बचावल्याही होत्या. त्यावेळी त्यांनी सुकांत सावंतविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रारी दिली होती. त्या तक्रारीवरुन सुकांत सावंत याच्यावर भादंविक 307 नुसार दोन गुन्हे दाखल आहे. याशिवाय सुकांत सावंत यांच्यावर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे ११ गुन्हे दाखल होते. त्यापैकी ८ गुन्ह्यात त्याची निर्दोष सुटका झाली आहेत. मात्र, ३ प्रकरणांचा खटला न्यायालयात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT