• उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मनसेसोबत अनपेक्षित युती केली असून पोस्टरवर शरद पवार आणि राज ठाकरे एकत्र झळकले आहेत.
• मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा करणारी काँग्रेस उरणमध्ये मात्र युतीचा भाग झाली आहे.
• महाआघाडी–मनसे संयुक्त उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना घाणेकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
Raigad News : उरण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या नगरपरिषदेवर आपलाच झेंडा फडकावण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष सज्ज झाले आहेत. एकीकडे भाजपने येथे स्वबळाची चाचपणी केली असतानाच महाविकास आघाडीने मात्र मनसेसोबत युती करत राजकीय उलथा-पालथ घडवून आणली आहे. कारण येथे एकत्र आलेली मनसे आणि आघाडीतील काँग्रेस मुंबईत एकमेकांच्या विरोधात आहेत. अशातच येथे झालेल्या या युतीमुळे रायगडच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे भाजपच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे.
उरण नगरपरिषदेच्या सत्ता केंद्रापासून भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) युती केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काँग्रेस आणि मनसे एकत्र आली असून एकाच पोस्टरवर शरद पवार आणि इतर नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो आता दिसून येत आहे.
या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत असून महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना घाणेकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.15) वाजतगाजत मिरवणूक काढत दाखल करण्यात आला.
तसेच यावेळी प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10 मधून महाविकास आघाडीच्या 21 नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महावि-शेकाप व मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत हम भी कुछ कम नहीं, असे भाजपला दाखवून दिले आहे.
उरण नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी -शेकाप व मनसे एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून यामुळे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्यासमोर जोरदार आव्हान उभे राहिले आहे. तसेच उरणकरांनाही आणखी एक नवा पर्याय मिळणार आहे. यामध्ये आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा भावना घाणेकर या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
उरण शहर हा उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शहरात असणारी महेश बालदी यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडी-शेकाप व मनसे एकत्र आली आहे. तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीने येथे धनशक्तीविरोधात जनशक्ती असे चित्र येथे निर्माण केले आहे. पण ते निवडणुकीतही तसेच राहते का हे बघावं लागणार आहे.
FAQs :
स्थानिक पातळीवरील समीकरणे, भाजपविरोधी मतांची एकजूट आणि नगराध्यक्ष पदाची लढत लक्षात घेऊन ही युती झाली आहे.
याच युतीचे प्रतिक म्हणून प्रचार पोस्टरवर सर्व आघाडीचे नेते एकत्र दाखवले गेले आहेत.
मुंबईसाठी वेगळी रणनिती असून, उरणमध्ये विरोधी मतांचे एकत्रीकरण साधण्यासाठी काँग्रेस आघाडीत आहे.
संयुक्त उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना घाणेकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाली आहे.
भाजप उरण नगरपालिकेची निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.