उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) महानगरपालिकेची आगामी निवडणूक (Municipal elections) एकत्र लढण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) घेतला आहे. कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उल्हासनगरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्या मुळे शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे.
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शहरातली राजकीय गणिते बदलली आहेत. आधी भाजपसोबत असलेल्या कलानी गटाने पप्पू कलानी यांनी जेलबाहेर येताच ३२ नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यातच पप्पू कलानी यांनी वैयक्तिक भेटीगाठी घेत सध्या उल्हासनगर शहर अक्षरशः पिंजून काढले आहे. त्या मुळे सध्याचे वातावरण पाहता उल्हासनगर महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येईल, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र, या सगळ्याने महापालिकेत सध्या सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या गोटात काहीसे असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. त्या मुळे शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्याला राष्ट्रवादी आणि कलानी परिवारानेही भविष्याचा विचार करत होकार दिला. दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांची नुकतीच एक प्राथमिक बैठक झाली, ज्यात निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेकडून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी सभागृह नेते धनंजय बोडारे, नगरसेवक अरुण आशान तर राष्ट्रवादीकडून पप्पू कलानी यांचे सुपूत्र ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी, माजी नगरसेवक मनोज लासी उपस्थित होते.
बैठकीत एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर बाकीच्या गोष्टी पुढच्या बैठकीत ठरवल्या जाणार आहेत. या सगळ्याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे आम्ही स्थानिक पातळीवरही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीची वाढती ताकद पाहता शिवसेनेने एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतला का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, पप्पू कलानी जेलबाहेर असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली असेल, शिवसेनेला त्याचा काही फरक पडत नसून यापूर्वीही पप्पू कलानी शहरात असताना आम्ही निवडणुका लढवल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून निवडणुका लढवल्या, तरीही शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरला, असे त्यांनी स्पष्ट केले. महापौरपदाबाबत विचारले असता, ज्याचे जास्त नगरसेवक येतील त्याचाच महापौर होईल, असे सांगत भविष्यात आमचे वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही चौधरी म्हणाले.
ओमी कलानी म्हणाले, आत्ता एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एकत्र लढलो, तर दोन्ही पक्षांचा फायदाच होईल, असे ते म्हणाले. या दोन पक्षांच्या आघाडीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेली काँग्रेस मात्र अद्याप सहभागी झालेला नाही. काँग्रेसने याआधीच 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याने आम्ही त्यांना विचारात घेतले नसल्याचे शिवसेना व राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. काँग्रेसला उल्हासनगरात आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर आघाडी म्हणून निवडणुका लढवण्याशिवाय पर्याय नाही, अशीच स्थानिक पातळीवरची परिस्थिती आहे. कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कमकुवत बनलेली भाजप येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर कितपत तग धरू शकेल, हे मात्र सांगता येणे कठीण आहे. काहीही असले, तरी उल्हासनगर शहराचे राजकारण येत्या निवडणुकीत 'कलानी' नावाभोवतीच फिरणार, हे मात्र स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.