MLA Sunil Bhusara with Deputy CM Ajit Pawar Sarkarnama
कोकण

राष्ट्रवादीच्या आमदारानं सगळ्या तालुकाध्यक्षांना वाटल्या चारचाकी गाड्या

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या गाड्या तालुकाध्यक्षांना सुपूर्द करण्यात आल्या.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष व आमदार सुनील भुसारा (Sunil Bhusara) यांनी गुरूवारी मोठं औदार्य दाखवलं. त्यांनी स्वखर्चाने जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या अध्यक्षांना चारचाकी गाड्या दिल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते या गाड्या तालुकाध्यक्षांना सुपूर्द केल्या. भुसारा यांच्या या औदार्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.

राष्ट्रवादीकडून ट्विट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव जनमानसात अधिक बळकट करण्यासाठी पक्षाचे पालघर (Palghar) जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांनी स्वखर्चातून जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना गाडी देण्याची संकल्पना अंमलात आणली, असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

गुरूवारी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात यापैकी दोन गाड्यांचे पूजन करून गाडीच्या चाव्या तालुकाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी आमदार दौलत दरोडा, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे तसेच पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलसरा, जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड असे आठ तालुके आहेत. सुनील भुसारा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे ते संचालक आहेत. दरम्यान, गुरूवारी भुसारा यांच्यासह राज्यातील पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांना अजित पवारांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले. जयंत पाटील यांची ही संकल्पना आहे.

भुसारा यांच्यासह ठाणे शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे, मालेगावचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार आसिफ शेख, सांगलीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, उल्हासनगर शहराध्यक्ष पंचम कलानी, नवी मुंबईचे अध्यक्ष अशोक गावडे यांनाही ओळखपत्र देण्यात आले. इतर जिल्हाध्यक्षकांना काही दिवसांतच ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT