Shivsena-NCP
Shivsena-NCP Sarkarnama
कोकण

शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का : पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बांधले हाती शिवबंधन

सरकारनामा ब्यूरो

राजापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीचे ढोल वाजत असताना राजापूर तालुक्यातील ओणी पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) माजी पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर यांच्यासह पक्षाचे विभागाचे अध्यक्ष दयानंद चौगुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनीष लिंगायत यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरामुळे राजापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. (NCP office bearers from rajapur join Shiv Sena)

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे ओणी भागात शिवसेनेची पकड अधिक घट्ट झाली आहे. ओणी येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यामध्ये या सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी स्वागत केले.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य मटकर यांनी राष्ट्रवादीचे विभागाध्यक्ष दयानंद चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक उपाध्यक्ष मनिष लिंगायत, बूथ कमिटी अध्यक्ष जितेंद्र वेताळे, ओणी विभागाचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष समीर तुळसणकर, सचिन टाकळे या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे यापूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ओणी येथे झालेल्या मेळाव्यामध्ये मटकर यांच्या नेतृत्वाखाली खरवते, वडवली, कोंडीवळे, वडदहसळ आदी गावांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत प्रवेश करताच मिळाले उपविभागप्रमुखपद

ओणी विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस रुजविण्यासह वाढवण्यामध्ये योगदान देणारे दयानंद चौगुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताच त्यांची शिवसेनेच्या ओणी पंचायत समिती गणाच्या उपविभागप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीची शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी या मेळाव्यामध्ये घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT