Raigad Warehouse Shed Collapse Accident Sarkarnama
कोकण

Raigad Accident : रायगडमध्ये गोडाऊनचे शेड कोसळून मोठी दुर्घटना : 30 जण जखमी; एका कामगाराचा मृत्यू

Raigad Khalapur Shed Collapse : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मानकिवळी येथे गोडाऊन शेड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या घटनेत 20 ते 25 कामगार जखमी झाले आहेत.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे गोडाऊनच्या बांधकामादरम्यान लोखंडी शेड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अंदाजे २० ते २५ कामगार जखमी झाल्याचे वृत्त असून, आठ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१३ ऑक्टोबर) रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे कस्तुरी लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनच्या शेडचे बांधकाम सुरू होते. यावेळी अचानक संपूर्ण लोखंडी शेड कोसळले. शेडचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेड आणि बांधकामाचे साहित्य अंगावर पडल्याने अनेक कामगार त्याखाली अडकल्याचे वृत्त समोर आले.

घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे सदस्य, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.

२० ते २५ कामगार जखमी; एकाचा मृत्यू

या दुर्घटनेत अंदाजे २० ते २५ कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी आठ कामगार गंभीर जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी सुमारे ३० ते ३५ कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेडच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याबाबत तपासणी आणि बचावकार्य सुरू आहे.

सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

गोडाऊनचे शेड नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू असून, बांधकाम प्रकल्पाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण आणि संबंधितांवरील पुढील कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण शेड कोसळल्याने मोठे नुकसान

कस्तुरी लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनचे शेड बांधण्याचे काम सुरू असतानाच संपूर्ण लोखंडी रचना कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर बांधकामाचे साहित्य कामगारांच्या अंगावर पडल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बचावकार्य आणि पोलिसांचा तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT