Raigad News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगड दौऱ्यावर असतानाच जिल्ह्यात मोठी घडामोड घडली आहे. 4 दिवसांपूर्वी निवड झालेल्या म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शाहिद जंजिरकर यांनी सोमवारी (11 मे) तडाफडकी राजीनामा दिला. संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
चार दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचयतीच्या नगराध्यक्षांची निवड झाली होती. यात 16 पैकी 9 मते घेत शिवसेना-काँग्रेस युतीचे उमेदवार शाहिद जंजिरकर यांनी विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांना अवघी 6 मते मिळाली होती. पण आज जंजिरकर यांनी अचानक राजीनामा दिला आहे.
वरिष्ठांच्या सुचनेनुसार जंजिरकर यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. आता म्हसळा नगरपंचायतीचा कालावधी 7 महिने शिल्लक असून यातील 3 महिने राष्ट्रवादीकडे तर उर्वरित 4 महिने शिवसेनेकडे नगराध्यक्ष पद राहणार आहे. खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यात याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 13 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती बहुमत मिळवले होते. तर शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 2-2 जागांवर यश मिळाले होते. पण 4 महिन्यापूर्वी अंतर्गत वादातून नगराध्यक्षासह अन्य 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता स्थापन केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 पैकी 7 नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने निकाल देत 7 जणांचे सदस्यपद रद्द केले. पुन्हा येथे प्रभारी नगराध्यक्ष पदाची नेमणूक करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने नगरसेवकपद रद्द ठरवल्याने सदस्यांनी नगरविकास मंत्रालयाकडे अपील दाखल करून दाद मागितली.
नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरु असतानाच नगरविकास विभागाने अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे हे 7 जण पुन्हा पात्र ठरले. 4 दिवसांपूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व नगरसेवकांसाठी व्हीप काढला होता. अपात्र ठरलेल्या नगरसेवकांसाठीही हा व्हीप लागू केला होता. पण या सर्वांनी शिवसेनेलाच मतदान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.