Raj Thackeray Chhath Puja controversy Sarkarnama
कोकण

Raj Thackeray : छटपूजेच्या व्हिडिओंमागे निवडणुकीचं राजकारण? राज ठाकरेंचा इशारा; 'रील पाहून भडकू नका, फॅक्ट चेक करा!'

Raj Thackeray On Chhath Puja viral videos : राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Aslam Shanedivan

Dombivli News : डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. जात-धर्माच्या वादात अडकण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा, मतदारांपर्यंत पोहोचा आणि मतदार याद्यांची बारकाईने पडताळणी करा, असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला.

छटपूजेच्या कार्यक्रमांमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामागे निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्रात आम्हीच तुमचे कैवारी आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय मतदारसंघ तयार करण्याचे प्रयत्न होत असल्याची शक्यताही राज ठाकरेंनी मांडली.

जात-धर्माच्या वादात अडकू नका!

जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विषयांमध्ये अडकून राहू नका, असा स्पष्ट संदेश राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. जाती-धर्मापलीकडे जाऊन सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क वाढवण्यावर भर द्या. महिला आणि पुरुषांमधील वाढती बेरोजगारी, नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि स्थानिक प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक रील किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. मराठी भाषेच्या वादातून लोकांच्या भावना भडकवणारे व्हिडिओ जाणीवपूर्वक प्रसारित केले जात आहेत का, याची पडताळणी करा आणि फॅक्ट चेक केल्याशिवाय कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देऊ नका, असेही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीला प्राधान्य द्या, असे राज ठाकरेंनी सांगितले. मतदार यादीतील नावे संबंधित भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची आहेत का, याची तपासणी करा. मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी आतापासूनच सज्ज राहा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ठाण्यात मतदानाच्या शेवटच्या तासात तब्बल 80 हजार मतांची वाढ झाल्याच्या उदाहरणाचा राज ठाकरेंनी उल्लेख केला. या पार्श्वभूमीवर मतदार यादी आणि SIR प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी पदाधिकाऱ्यांना अधोरेखित केली.

मनसेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी आक्रमकतेसोबत संयम, वस्तुस्थितीची पडताळणी, मतदार याद्यांवर लक्ष आणि नागरिकांशी थेट संपर्क या बाबींना प्राधान्य देण्याचा संदेश दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT