Rajan Teli-Deepak Kesarkar
Rajan Teli-Deepak Kesarkar Sarkarnama
कोकण

Kokan News : राणेंच्या निकटवर्तीय नेत्याचे केसरकरांना चॅलेंज : ‘आमचं ठरलंय, मैदानात उतरा एकदाचे...’

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : सावंतवाडी (Sawantwadi) विधानसभा मतदारसंघाचा ताम्रपट कोणा एकट्याला दिलेला नसून आपला आमदार कोण असावा, हे येथील जनता व स्थानिक कार्यकर्ते ठरवतील. त्यामुळे उगाच कोणी भ्रमात राहू नये. स्वतःची ताकद आहे, तर युतीची वाट कशाला बघता? युती करावी किंवा नाही हा निर्णय वरिष्ठ घेतील. मात्र, आता काय करावे हे ‘आमचं ठरलंय.’ त्यामुळे मैदानात उतरा एकदाच, काय ते होऊन जाऊ दे, असे थेट आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचे नाव न घेता दिले. (Rajan Teli's challenge to Education Minister Deepak Kesarkar)

सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात शिंदे-भाजप युती असून युतीचे सरकार सत्तेत आहे. मात्र, काही जण आम्हाला सल्ले देण्याचे व आमच्यावर टीका करण्याचे काम करीत आहेत. या मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढताना येथील जनतेने मला ५८ हजार मते दिली. त्यामुळे येथील जनतेच्या समस्या व जनतेची भूमिका मांडताना माझा आवाज कोणी रोखू शकत नाही.

तेली म्हणाले, "स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सुरुवातीला नारायण राणेंशी जवळीक करून शरद पवार यांना शिव्या दिल्या. त्यानंतर मंत्रिपदासाठी राणेंवर टीका करून उद्धव ठाकरेंना जवळ केले. आता पुन्हा मंत्रिपदासाठी ठाकरे यांच्यावर टीका करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. भविष्यात पुन्हा स्वार्थ साधण्यासाठी आता केवळ भाजप हाच पर्याय त्यांना उरला आहे; मात्र भाजपचे कार्यकर्ते समजदार असून कोणाला जवळ करावे, याची त्यांना पूर्णपणे जाण आहे.

येथील जनतेने वेळोवेळी भाजपवर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे येथील जनतेची कामे करण्यासाठी मला कोणाच्या शिफारशीची गरज नाही. विद्यमान लोकप्रतिनिधींपेक्षा मीच या मतदारसंघात जास्त वेळ देतो. त्यामुळे आमच्या नेत्यांकडे भेटून आमच्याबद्दल सांगण्यापेक्षा तुमच्यासोबत किती शिवसैनिक आले, याचा लेखाजोखा आम्हालाच तुमच्या नेत्यांकडे द्यावा लागेल, असा इशाराही राजन तेली यांनी दिला.

ते म्हणाले की, मागील पंधरा वर्षांत आश्वासनांपलीकडे येथील जनतेच्या पदरात काहीच पडलेले नाही. सेट टॉप बॉक्स, चष्म्याची फॅक्टरी, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्न यापैकी काहीच मार्गी लागले नाही. उलट विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी या मतदारसंघासाठी देण्यात आला आहे.

सावंतवाडी शहराचे गतवैभव परत आणण्यासाठी नागपूरच्या धर्तीवर मोती तलावाचे सुशोभीकरण व फाउंटन उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची मागणी आम्ही उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री व पालकमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे विकास आम्हीच करू शकतो, हे येथील जनतेला माहीत असून आता जनता यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वासही तेली यांनी व्यक्त केला.

‘तुमचीच विधान परिषदेवर सोय करू’

माझ्या नावाची विधान परिषदेवर शिफारस करण्याची गरज नाही. भविष्यात तुम्हालाच पक्षात घेण्यासाठी किंवा तुम्हाला विधान परिषद देण्यासाठी मलाच तुमच्या नावाची शिफारस करावी लागेल, असा टोलाही तेली यांनी लगावला. अलीकडे झालेल्या सावंतवाडीतील मेळाव्यात मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात भाष्य केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT