Yogesh Kadam - Ramdas Kadam Sarkarnama
कोकण

ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन करून रामदास कदमांचा इशारा, लवकरच गौप्यस्फोट होणार..

शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे पक्षात नाराज असल्याची चर्चा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई, ता. १७ : पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढावलेले शिवसेना नेते रामदास कदम लवकरच गौप्यस्फोट करणार आहेत. याबाबत कदम यांनी स्वतःच घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या गौप्यस्फोटात काय असणार, याची आता उत्सुकता आहे.

कदम यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर काल अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी कडवट शिवसैनिक आहे, बेईमानी करणार नाही. बाळासाहेबांनी आमच्यासारख्या सामान्य माणसांना मोठे केले, लवकरच गौप्यस्फोट करेन, असेही त्यांनी नमूद केले.

रामदास कदम यांच्या संभाषणाच्या कथित क्लिप व्हायरल झाल्या होत्या. कदम यांनी प्रसाद कर्वे या व्यक्तीच्या माध्यमातून परिवहन मंत्री अनिल परब, तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा त्याआधारे करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले.

आता हा गौप्यस्फोट स्वपक्षीयांच्या विरोधात असणार की इतरांच्या विरोधात यावर चर्चा झडू लागल्या आहेत. कदम यांची विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपत आहे. ते पुन्हा आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत.

मुंबई महापालिका मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. मात्र त्यांनी परब यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचे बोलले जाते. कदम यांचे चिरंजीव हे विधानसभेत आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर काही परिणाम होईल, असे रामदास कदम बोलणार नाहीत, अशी शिवसेनेतील नेत्यांना आशा आहे. दुसरीकडे कदम यांची समजूत काढण्यासाठी सेनेतील दरबारी नेते पुढाकार घेतली, असेही सांगण्यात येत आहे.

राज्यात सध्या संजय राऊत, नवाब मलिक, किरीट सोमय्या हे रोज फटाके फोडत असताना त्यात कदम यांची भर पडली तर तो आणखीनच चर्चेचा विषय ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT