हर्णै : आगामी दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) आणि सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांच्यातील राजकीय छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला असून त्यांच्यातील राजकीय अहममिकेमुळे दापोली शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. रामदास कदमांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर दापोलीच्या राजकीय परिस्थितीने 'यू टर्न' घेतला असून पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सेनेची हंगामी तालुका कार्यकारिणी जाहीर करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडल्याचे बोलले जात आहे.
दापोली शहरात सध्या नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय धुरळा पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी केल्याचे आमदार योगेश कदम यांनी जाहीर करून नगरपंचायत निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती असल्याचे संकेत दिले होते. साहजिकच त्या दृष्टीने उमेदवार चाचपणी व बांधणी करण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली होती. दरम्यान, योगेश कदम यांच्याशी राजकीय सख्य नसलेली काही मंडळीनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हातात बांधून राजकीय उलथापालथ करण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वी, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सेनेला राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, सेनेतील नाराज गटाचे एक संचालक मंडळ परबांना भेटल्यानंतर दापोलीच्या शिवसेनेमध्ये उलथापालथ होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत होतीच. यामध्ये परबांनी दापोली दौऱ्यावर येऊन हंगामी कार्यकारिणी निर्माण केल्याने रामदास कदम विरुद्ध सूर्यकांत दळवी असा संघर्ष आता ईर्ष्येला पेटणार आहे. त्यातच शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने विद्यमान आमदार योगेश कदम यांची येत्या काळात कशी राजकीय भूमिका असणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
दापोलीतील शिवसैनिक चिंतेत
सध्या तरी दापोलीतील शिवसेना कदम व दळवी अशा दोन गटांमध्ये विभागल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दापोलीतील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी होत असलेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे शहरातील वातावरण कमालीचे तापलेले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर कोणाचे राजकीय वजन वाढणार आणि कुणाचे कमी याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.