Ratnagiri News : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटात असलेले माजी आमदार संजय कदम व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यात राजकीय वैमानस्य सर्वज्ञात आहे. संजय कदम यांच्यावरती रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे.
अहो यांना राजकारणात मोठे मीच केले असून यांचा राजकीय बाप मीच आहे, याच संजय कदमाने खेड येथील भरणा नाक्यात भगवा झेंडा पायाखाली घेऊन जाळला होता. त्याच दिवशी मी याला गाडण्याची शपथ घेतली होती, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली.
खेड आंबवली येथील कार्यक्रमात ते बोलत होते. संजय कदमला मोठा मी केला. तुम्हाला पंचायत समितीचे तिकीट, जिल्हा परिषदेचे तिकीट, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि मग तू नशिबाने तुझ्या आमदार झालास. मी त्या वेळेला येथे सभा घ्यायला आलो नाही म्हणून तुमची औकात काय ? तुम्ही आव्हान कोणाला देताय? असा खडा सवालच रामदास कदम यांनी उपस्थित केला.
मी गेले अनेक वर्ष संघटनेचे काम करत असताना वीस वर्षे येथे आमदार होतो. आपले अनेक वर्षांचे संबंध आहेत पण मी कधीही जात-पात धर्म पहिला नाही. या तालुक्यामध्ये मुस्लिम बांधवांसह सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आणि विकासकामे करण्याचे काम हे तुमच्या रामदास कदमने केले आहे. तरी या ठिकाणी भांडण लावायची कटूता निर्माण करायची आणि मग राजकीय पोळी आपण भाजून घ्यायची, हे धंदे सध्या सुरू आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी सावध असले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यांच्या हातामध्ये काही नाही हे पिल्लं कुठली या पिल्लाना मीच मोठी केली आहे. यांच्या पायात चपला नव्हत्या. आज आमदार वगैरे माजी आमदार झालेत यांना मोठा मीच केले आहे, असाही टोला रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी लगावला.
यावेळी त्यांनी आमदार योगेश कदमांच्या कामाचे कौतुक केले. 'बाप से बेटा सवाई' हे मी आज अनुभवतो आहे. बापापेक्षा बेटा अधिक चांगले काम करतोय, अशा शब्दांत त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या कामाचं कौतुक केले आहे.
(Edited By Sachin Waghmare)