Gram Panchayat Elections Sarkarnama
कोकण

Gram Panchayat Elections : भाजपची निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी: जुन्या जाणत्या नेत्यांवर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची जबाबदारी; चार प्रभारींची नियुक्ती

BJP Election Strategy For Ratnagiri : जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांना अद्याप अवधी असतानाच भाजपने आपली रणनीती आखली आहे. भाजपने तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये जुन्या आणि अनुभवी पदाधिकाऱ्यांची ‘प्रभारी’ म्हणून नियुक्ती केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसह भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढवण्यासोबतच बूथ स्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यासाठी भाजपकडून महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी, चिपळूण आणि लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुभवी आणि जुन्या पदाधिकाऱ्यांकडे प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. आगामी काळात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या संभाव्य बदलांचा विचार करून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून अनेक वर्षे पक्षासाठी काम केलेल्या आणि यापूर्वी जिल्हाध्यक्षपद भूषवलेल्या अनुभवी नेत्यांना पुन्हा संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चार प्रभारींची नियुक्ती

भाजपने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी चार विभागांत विभागली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहराच्या प्रभारीपदी सचिन वहाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी दक्षिणची जबाबदारी अशोक मयेकर, उत्तर विभागाची जबाबदारी दत्ता देसाई, तर मध्य विभागाची जबाबदारी सतीश शेवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या चारही नेत्यांनी यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा संघटनात्मक अनुभव आणि स्थानिक पातळीवरील संपर्क पक्षासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चिपळूण आणि लांजा-राजापूरमध्येही नियुक्त्या

रत्नागिरीबरोबरच जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या भागांमध्येही भाजपने प्रभारींची नियुक्ती केली आहे. लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी अमित केतकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर संगमेश्वर तालुक्याच्या प्रभारीपदी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातही संघटनात्मक कामकाजाच्या दृष्टीने दोन विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये चिपळूण ग्रामीणची जबाबदारी स्वप्ना यादव यांच्याकडे, तर चिपळूण शहराच्या प्रभारीपदी मधुकर निमकर यांची निवड करण्यात आली आहे.

बूथ पातळीवर संघटना मजबूत करण्याचे लक्ष्य

या नव्या नियुक्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात पक्षाचा जनाधार वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, मतदारांशी थेट संपर्क वाढवणे आणि बूथ स्तरावर संघटनात्मक यंत्रणा मजबूत करणे, यावर नवनियुक्त प्रभारी लक्ष केंद्रित करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने अनुभवी नेत्यांना पुन्हा मैदानात उतरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत कितपत वाढ होते आणि त्याचा आगामी निवडणुकांमध्ये किती फायदा मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT