Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Ratnagiri Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्गात ठाकरे गट तरणार की...

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency Thackeray Group vs Bjp Shinde Group : ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची अस्तित्वाची लढाई...

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency Politics :

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा राजापूर मतदारसंघ होता 2008 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. पूर्वीच्या राजापूर मतदारसंघावर 1991 पर्यंत समाजवादी व कॉंग्रेसचे वर्चस्व होते. मात्र 1996 पासून या मतदारसंघावर शिवसेना-भाजपचे कायमच वर्चस्व राहिले आहे. या वेळेला हा सामना महायुती व ठाकरे गट यांच्यात होणार, हे निश्चित आहे.

ठाकरे गटाकडून यावेळी विद्यमान खासदार Vinayak Raut यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे. यावेळची राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सहज विजय मिळवलेले विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासाठी यावेळची निवडणूक ही सोपी नसून अस्तित्वाची लढाई असणार आहे. महायुतीकडून उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भय्या सामंत, विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार ही नावे चर्चेत आहेत.

ठाकरे गटाची कोंडी

रत्नागिरी जिल्हा हा दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. उत्तर रत्नागिरीतील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात, तर चिपळूणपासून पुढे अगदी सावंतवाडीपर्यंत सगळे विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतात.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी व राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील तीन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघात येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुडाळ, कणकवली, देवगड व सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. 2009 मध्ये काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे हे इथून खासदार झाले. हा अपवाद वगळता मतदारसंघात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे.

शिवसेना व काँग्रेस या दोघांमध्येच आजवर सरळ लढत झाली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये आल्यावर या मतदारसंघातील गणितं बदलली आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना व भाजप यांच्यामध्येच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची मोठी ताकद आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात मंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व असले तरीही राणे यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील संपर्क मोठा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदारसंघ हा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या ताब्यात आहे, तर कणकवली देवगड हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून नीतेश राणे या मतदारसंघाचे आमदार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर मतदारसंघ ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याकडे आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा विद्यमान मंत्री उदय सामंत यांचा आहे, तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या ताब्यात आहे. पण एकंदरच या लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी या महायुतीचे वर्चस्व आहे. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांतील केवळ दोनच मतदारसंघ हे ठाकरे गटाकडे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणाला उमेदवारी मिळणार?

या सगळ्या पार्श्वभूमीवर या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भय्या सामंत यांचे नाव चर्चेत आहे, तर भाजपकडून प्रमोद जठार व विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण ही दोन नावे चर्चेत आहेत. भाजपकडून या लोकसभा मतदारसंघावर मोठा दावा करण्यात आला आहे.

लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यास शिवसेना अथवा भाजप, राष्ट्रवादीचा उमेदवार बाजी मारू शकतो, अशी परिस्थिती आहे. या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेना-भाजपची ताकद ही मोठी आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ विभाजनाच्या पूर्वी म्हणजेच 2008 च्या पूर्वी राजापूर मतदारसंघ होता. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर या लोकसभा मतदारसंघाची आता व्याप्ती वाढली असून याचा विस्तार चिपळूणपर्यंत झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ हे रायगड लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आले आहेत.

मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय सांगतो?

1952 मध्ये काँग्रेसचे मोरेश्वर दिनकर जोशी, 1957 मध्ये समाजवादी विचारांचे बॅरिस्टर नाथ पै त्यांना एक 1962, 1967 मध्ये पुन्हा बॅरिस्टर नाथ पै यांनी विजयाची हॅटट्रिक करीत ते पुन्हा खासदार झाले. त्यानंतर 1971, 1977, 1980, 1984, 1989 असे तब्बल सहा टर्म माजी केंद्रीयमंत्री व कोकण रेल्वेचे भाग्यविधाते मधुभाई दंडवते यांनी या राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 1991 मध्ये काँग्रेसचे सुधीर सावंत निवडून आले.

1996 व 1998, 1999, 2004 मध्ये माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी या मतदारसंघाचे तब्बल चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नीलेश राणे हे खासदार झाले.

2014 व 2019 पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत या मतदारसंघाचे खासदार आहेत. हा मतदारसंघ अनेक दिग्गज नेत्यांचा राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आता उमेदवार कोण असेल, यावरच येथील विजयाची गणितं सरळसरळ अवलंबून आहेत. एकंदरीतच महायुतीसाठी अनुकूल असलेला हा मतदारसंघ आहे.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT