Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency Sarkarnama
कोकण

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून भाजपचा पहिला खासदार होण्याची प्रमोद जठारांची इच्छा!

Anand Surwase

Lok Sabha Election 2024 : कोकणातील रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक नेत्यांची नावे समार येत आहेत. त्यामध्ये भाजपकडून पक्षाचे प्रदेश सचिव जठार यांनीही निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले आहे. भाजपने प्रमोद जठार यांच्यावर रत्नागिरी -सिंधुदुर्ग या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जठार यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत. Lok Sabha Election 2024

प्रमोद जठार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले भाजपचे अभ्यासू आणि आक्रमक राजकारणी म्हणून ओळखले जातात. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी भाजपचे काम सुरू केले होते. कोकणात भाजपचा विस्तार करण्यात जठार यांचा मोठा वाटा मानला जातो. त्यांनी 2009 मध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र पाठक यांचा पराभव करत पहिल्यांदा विधानसभेचे सदस्यत्व मिळवले होते. पुढे तत्कालिन काँग्रेसचे उमेदवार नितेश राणे यांच्याकडून जठार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मात्र राणे कुटुंबच भाजपमध्ये सहभागी झाल्याने पुढील निवडणुकीत जठार यांचा पत्ता कापला गेला. ज्यांना विरोध करत त्यांनी कोकणात पक्ष वाढवला, आता त्यांचाच प्रचार करण्याची वेळ जठार यांच्यावर आल्याने काँग्रेसकडून त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते.

दरम्यान, जठार यांना रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघाचे प्रभारी केल्यानंतर त्यांनीही आपणच आता भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. मी ताकाला जाऊन भांडे कशाला लपवू, राजकारणात प्रत्येकजण महत्वाकांक्षा बाळगून असतोच, असे म्हणत पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जठार हे 2019 च्या निवडणुकीपासून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या कामावर अंकुश ठेवण्याचे काम करत आले आहेत. मतदारसंघातील रखडेलेली विकासाची कामे, रिफायनरी प्रकल्प, मुंबई -गोवा महामार्ग यासह कोकण किनारपट्टीवरील बंदर विकासाचे प्रश्न घेऊन जठार नेहमीच आक्रमक भूमिका घेतात.

नाव (Name)

प्रमोद शांताराम जठार

जन्मतारीख (Birth date)

19 एप्रिल 1965

शिक्षण (Education)

बी. कॉम.

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

प्रमोद जठार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले राजकारणी आहेत. कोकणातील कणकवली तालुक्यातील कासर्डे हे त्यांचे गाव आहे. प्रमोद जठार यांच्या वडिलांचे नाव शांताराम जठार तर मातुःश्रींचे नाव सुनीता शांताराम जठार असे आहे. त्यांच्या पत्नीचे नाव निरजा जठार असे असून, त्यांना अभिषेक नावाचा एक मुलगा आहे. अभिषेक हे व्यवसाय पाहतात.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

रत्नागिरी -सिंधुदुर्ग

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भाजप

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

प्रमोद जठार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून त्यांनी स्वकर्तृत्वाने राजकारणात स्वत:चे स्थान भक्कम केले आहे. शालेय जीवनात असल्यापासून जठार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. त्यानंतर त्यांनी पक्षात विविध संघटनात्मक पदांवर काम केले. ही कामे करत असताना त्यांनी जेएनपीटीचे संचालक, महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. जठार यांनी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. दरम्यान, भाजपने त्यांना 2009 मध्ये त्यांना कणकवली मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी रवींद्र पाठक हे काँग्रेसचे उमेदवार होते. या अटीतटीच्या निवडणुकीत प्रमोद जठार यांनी पाठक यांचा अवघ्या 34 मतांनी निसटता पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्येही जठार यांना पक्षाकडून संधी मिळाली, मात्र नितेश राणे यांनी 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या निसटत्या पराभवाचा वचपा काढला. नितेश राणे यांना 74,715, तर जठार यांना 48,736 मते मिळाली होती.

पुढे नितेश राणे यांनी 2019 ची निवडणूकही भाजपच्या तिकीटावर लढवल्याने जठार यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर पक्षाने जठार यांना महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव म्हणून नियुक्त केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जठार यांना रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी केले आहे. यावर जठार यांनी मी ताकाला जाऊन भांडे लपवणार नसल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. तशी मतदारसंघात त्यांनी तयारीही सुरू केली आहे. यापूर्वी 2019 मध्ये विनायक राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी जठार यांनी केली होती. युतीमध्ये राऊत यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपचा कोणताही कार्यकर्ता त्यांचे काम करणार नसल्याची भूमिका जठार यांनी घेतली होती.

आता महायुतीमध्ये भाजप, शिवसेने शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी आहेत. त्यामुळे युतीमध्ये ही जागा कोण लढवणार यावर आणि भाजपची केंद्रीय निवडणूक समिती उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेणार यावर जठार यांच्या लोकसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल. असे असले तरी जठार यांनी निवडणूक लढवण्याच्या हेतूने मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. समजा ही जागा शिंदे गटाला सुटल्यास या ठिकाणी शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे युतीकडून कोणत्या उमेदवाराला संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

प्रमोद जठार हे कोकणातील सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणारे नेते आहेत. खेड्या-पाड्यांतील मतदारांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्गमधील शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार यांच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच आग्रहाची भूमिका घेतली आहे. कोकणातील दुधाचा तुटवडा कमी व्हावा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला व्हावा, यासाठी जठार यांनी पुढाकार घेऊन सिंधुभूमी डेअरी फार्मची स्थापना केली. त्या माध्यमातून दूध संकलन करून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. मच्छीमारांसाठी देवगड आनंदवाडी बंदराच्या विकासाचे काम मार्गी लावले. कोकण किनारपट्टीवर पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. यासह कोकणात फळउद्योग प्रक्रिया उद्योग, ऊस संशोधन केंद्र यासारखे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी जठार यांनी पाठपुरावा केला आहे. याशिवाय सुनीता शांताराम शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. सिंधुभूमी रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आरोग्यसेवा देण्याचे कार्यही जठार करत आहेत.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

निवडणूक लढवली नव्हती

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

प्रमोद जठार यांचा कणकवली विधानसभा मतदारसंघासह रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातही प्रभावी जनसंपर्क आहे. कोकणच्या विकासासाठी त्यांनी हाती घेतलेले प्रकल्प म्हणजे त्यांच्या विकासाच्या दूरदूष्टीचा सहज वेध घेता येईल असेच आहेत. कणकवलीचे आमदार असल्यापासून त्यांनी मतदारसंघात आपला जनसंपर्क ठेवला आहे. पक्ष संघटना वाढवण्याचे कार्य करत असताना त्यांनी सहजतेने कार्यकर्त्यांना आपलेसे करत पक्षाची विचारधारा जनतेमधे रुजवली आहे. त्यामुळे भाजपने त्यांना पक्ष संघटनेत महत्वाच्या पदासह मोठ्या विश्वासाने जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी केले आहे. ही जबाबदारी म्हणजे त्यांच्या प्रभावी जनसंपर्काची पोचपावतीच मानली जाते. याच सोबत हे मतदारांना सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जायचे. त्याचाही प्रभाव त्याच्या जनसंपर्कावर दिसून येतो.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

प्रमोद जठार हे सोशल मीडियाचा वापर अगदी प्रभावीपणे करताना दिसून येतात. जठार हे ट्विटरवर सक्रिय असून मतदारसंघातील प्रश्न, तसेच त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणारे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. याशिवाय जठार हे आपली राजकीय भूमिका व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करतात. https://twitter.com/pramodjathar?

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

शिवसेनेने 2019 मध्ये नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. त्यावेळी प्रमोद जठार यांनी नाणारचा बळी जाणार असेल तर कोकणात आम्हाला युती नको, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे कोकणात शिवसेना-भाजप युतीमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीकेचा भडिमार सुरू ठेवला होता. त्यावर जठार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे विक्रम आणि वेताळची जोडी असल्याची टीका केली होती. संजय राऊत यांनीच गेल्या अडीच वर्षांत शिवसेना लयाला घालवली. यापुढेही ते असेच उद्धव ठाकरेंचा पाठीवर बसून बोलत राहिले तर उरली सुरली शिवसेनाही संपेल अशी टीका त्यांनी केली होती. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर म्हणू नका, स्वराज्यरक्षक म्हणा, असे म्हटले होते. त्यावरून भाजप आक्रमक झाला होता. त्यावेळी जठार यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत अजित पवारांना सद्बुद्धी द्या, अशी टीका केली होती. याउलट जठार यांनी 2021 मध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक केली असताना नारायण राणेंची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली होती. त्यावेळी शिवसेनेकडून जठार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

प्रमोद जठार हे अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात. कोकणात पक्ष संघटनावाढीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. प्रदेश सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी कोकणच्या विकासाच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. याखेरीज भाजपने देखील जठार यांच्या अनुभवाची दखल घेत त्यांच्यावर सिंधुदुर्ग -रत्नागिरी या मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. सध्या या मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजपकडून रवींद्र चव्हाण, निलेश राणे यांच्यासह जठार यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. त्यातच निलेश राणे यांनी आपण या स्पर्धेत नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे भाजपकडून जठार यांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. जठार यांना उमेदवारी मिळाल्यास या ठिकाणी शिंदे गटाची आणि राणे गटाची मोठी ताकद त्यांच्या पाठिशी उभी राहणार आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

प्रमोद जठार हे भाजपचे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा सध्या रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात सुरू आहे. मात्र महायुतीमध्ये अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. गत निवडणुकीत शिवसेनेने ही जागा लढवली होती. यावेळी शिंदे गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास जठार यांचा पत्ता आपोआप कट होणार असून यावेळीही त्यांना दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागू शकतो. तसेच भाजपकडूनही ही जागा आपल्याकडे ठेवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी या ठिकाणी नितेश राणे, नारायण राणे या दोघांपैकी एकाचे नाव ऐनवेळी समोर येण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखील या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. नारायण राणे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्यास जठार यांच्या उमेदवारीसाठी राणे हे अडसर ठरू शकणार आहेत.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

प्रमोद जठार हे मागील दोन वर्षांपासून रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात पक्षवाढीचे काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मतदारसंघात आपला जनसंपर्कही वाढवला आहे. राणे कुटुंब भाजपमध्ये आल्यापासून जठार यांचा हक्काचा कणकवली मतदारसंघ राणेंकडे गेला. त्यानंतर पक्षाने आता जठार यांना रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी केल्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटत नाही. तोपर्यंत जठार यांची उमेदवारी अधांतरीच राहील.

जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेल्यास जठार यांचा पत्ता कट होणार आहे. असे झाल्यास जठार हे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असतील. मात्र जठार यांनी यावेळचा खासदार हा भाजपचाच असेल, असे मत व्यक्त केले होते. पक्षाकडून कोणालाही तिकीट मिळाले तर आपण तो उमेदवार लोकसभेत पाठवण्यासाठी ताकदीने काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता हा मतदारसंघ भाजप स्वत:कडे ठेवणार की शिंदे गटाला देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे आधीच स्पष्ट केल आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT