Panvel Municipal Elections; Mahayuti Victory Wins sarkarnama
कोकण

Mahayuti Politics : जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा ‘क्लीन स्वीप’, शेकापचा सुपडा साफ; मविआलाही जोरदार धक्का

Zilla Parishad And Panchayat Samiti Elections : जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यात त्सुनामी आणली.

Aslam Shanedivan

  • जिल्हा परिषद निवडणुकीत ५९ जागांपैकी बहुसंख्य जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

  • २०१७ मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला शेतकरी कामगार पक्ष यंदा एकही जागा जिंकू शकला नाही.

  • पनवेल आणि अलिबागमधील निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

Raigad News : वसंत जाधव

जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे. २०१७ च्या निवडणुकीत २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) यंदा पूर्णपणे सुपडा साफ झाला असून, पक्षाला साधे खातेही उघडता आलेले नाही. महाविकास आघाडीच्या (मविआ) उमेदवारांना अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आहे. जिल्हाभरात मतदारांनी महायुतीला कौल दिल्याचे चित्र निकालातून स्पष्ट होत आहे. विशेषतः पनवेल आणि अलिबाग या महत्त्वाच्या मतदारसंघांतील निकालांनी राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत.

भाजपचा ‘क्लीन स्वीप’

पनवेलमध्ये भाजपने दमदार कामगिरी करत सर्वच्या सर्व आठ जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे भाजपचा प्रभाव या भागात अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे, शेतकरी कामगार पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्याजाणाऱ्या अलिबाग आणि पनवेलमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही मतदारसंघांत शेकापला एकही जागा जिंकता आली नाही. २०१७ च्या निवडणुकीत सर्वाधिक २३ जागा जिंकणाऱ्या शेकापला यंदा खातेही उघडता आले नसल्याने हा पक्षासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

पनवेल तालुक्यातील ८ पैकी ८ जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालांनी पनवेल तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून, भाजपने ग्रामीण भागातही आपली पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शेकापसह इतर पक्षांसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा ठरला आहे. आगामी काळात या निकालांचा स्थानिक राजकारणावर आणि विकासाच्या दिशेवर मोठा प्रभाव पडणार, हे निश्चित आहे.

१६ पैकी १५ पंचायत समिती गटांत भाजपचा विजय झाला असून, केवळ एका गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला यश मिळाले आहे. या निकालामुळे पंचायत समितीवरही भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे. पंचायत समिती निकालांचा आढावा : वावंजे, चिंध्रन, नेरे, आदई, पाली देवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, वावेघर, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण आणि आपटा या गटांत भाजप उमेदवारांनी विजय मिळवला. केळवणे गटात मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वैदही घरात यांनी भाजप उमेदवारावर मात केली.

अलिबागमध्ये शिवसेना प्रभावी

अलिबागमध्ये शिवसेनेने प्रभावी कामगिरी करत सात पैकी सहा जागांवर विजय मिळवला. उर्वरित एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक यांनी जिंकली. या निकालामुळे अलिबागमध्ये शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून शेकापला अलिबाग तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. तर शेकापचा पारंपरिक बालेकिल्ला या निमित्ताने निसटला असून पंचायत समितीची सत्ताही पक्षाला गमवावी लागली आहे. शेकापने पाच जागांवर निवडणूक लढवली होती. तर दोन जागा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोडल्या होत्या. मात्र या सर्व जागांवर महाविकास आघाडीचा पराभव झाला असून शेकापला एकही जागा मिळवता आलेली नाही.

पंचायत समितीच्या १४ जागांपैकी केवळ एक जागेवर शेकापला विजय मिळाला असून एक जागा भाजपने जिंकली. उर्वरित १२ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने पंचायत समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

महाविकास आघाडीने लाज राखली

उरण तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीने लाज राखत तीन गटांत विजय मिळवला. दक्षिण रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळाली. या संघर्षात शिवसेनेने आघाडी घेत राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रातही प्रवेश केला आहे. रोहा पंचायत समितीमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच आपले अस्तित्व निर्माण केले.

शिवसेनेची मुसंडी

तसेच महाड आणि माणगावमध्येही शिवसेनेने मुसंडी मारत महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला. शेवटचे निकाल हाती येईपर्यंत भाजपने १३ जागांवर विजय मिळवला असून, शिवसेनेने १५ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित जागांवरील चित्र स्पष्ट होत असताना महायुतीची आघाडी ठळकपणे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील लागलेल्या या निकालामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच,रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा झंझावात कायम राहिला असून, मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदान केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पुढील काळात या निकालांचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर उमटण्याची चिन्हे आहेत.

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद निकाल

वावंजे : कमला देशेकर (भाजप) 11584 – विजयी

पालिदेवद : प्राची अमित जाधव (भाजप) 13461 – विजयी

नेरे : भस्मा आत्माराम बाळू (भाजप) 15343 – विजयी

पळसपे : हर्षदा अतुल घरात (भाजप) 16024 – विजयी

वावेघर : अनन्या गाताडे (भाजप) 10846 – विजयी

वडघर : सोनाली जीतेकर (भाजप) 14968 – विजयी

गव्हाण : निकिता खारकर (भाजप) 15127 – विजयी

कळवणे : मंगेश वाकडीकर (भाजप) 13124 – विजयी

पंचायत समितीत भाजपचे वर्चस्व

१६ पैकी १५ पंचायत समिती गटांत भाजपचा विजय झाला असून, केवळ एका गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला यश मिळाले आहे. या निकालामुळे पंचायत समितीवरही भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.

पंचायत समिती निकालांचा आढावा :

वावंजे, चिंध्रन, नेरे, आदई, पाली देवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, वावेघर, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण आणि आपटा या गटांत भाजप उमेदवारांनी विजय मिळवला. केळवणे गटात मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वैदही घरात यांनी भाजप उमेदवारावर मात केली.

FAQs :

1. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाला बहुमत मिळाले?
महायुतीच्या उमेदवारांना बहुसंख्य जागांवर विजय मिळाला.

2. शेतकरी कामगार पक्षाची कामगिरी कशी राहिली?
शेकापला यंदा एकही जागा जिंकता आली नाही.

3. महाविकास आघाडीला किती फटका बसला?
मविआच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला.

4. कोणते मतदारसंघ निर्णायक ठरले?
पनवेल आणि अलिबाग मतदारसंघांनी निकालाचे चित्र बदलले.

5. या निकालाचा राजकीय अर्थ काय आहे?
जिल्हाभरात मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिल्याचे संकेत मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT