Ravindra Chavan And Nilesh Rane sarkarnama
कोकण

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण माझे नेते! नगरपालिकेची निवडणूक उरकताच निलेश राणेंची तलवार म्यान, लवकरच भेटही घेणार

Mahayuti Politics : राज्यातील नगरपालिकेची निवडणुकीच्या दरम्यान महायुतीत राज्यभर वाद उफाळून आले होते. तळकोकणात तर मित्र पक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपविरोधात उघड उघड बंड पुकारत थेट पैसे वाटल्याचा आरोप केला होता.

Aslam Shanedivan

  1. नगरपालिका निवडणुकीदरम्यान महायुतीत राज्यभर तणाव निर्माण झाला होता, विशेषतः तळकोकणात शिंदे गटाने भाजपवर उघड आरोप केले होते.

  2. वाद मिटवण्यासाठी फडणवीस, शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लवकरच एकत्रित चर्चा करणार आहेत.

  3. निलेश राणे यांनी चव्हाणांशी वैयक्तिक वाद नसल्याचे सांगत ‘मिलूनच लढले तर निकाल मिळेल’ असे म्हटल्याने संघर्ष शांत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Sindhudurg News : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन्ही पक्षात वाद उफाळला होता. पण आता हा वाद शांत होण्याची शक्यता असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकत्रित चर्चा करणार आहेत. शिंदे यांनी चव्हाणांशी संपर्क साधून वादावर पडदा टाकला पाहिजे असेही म्हटल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. तोच फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणही माझे नेते असून मी त्यांना नक्की भेटेन, असे म्हणत वाद शांत व्हायला पाहिजे अशी इच्छा निलेश राणे यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे आगामी काळात येथील शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद शांत होण्याची शक्यता आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीत राज्यभर वाद सुरू झाले होते. पक्ष फोडाफोडी आणि भाजप प्रवेशावरून शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी होती. यावरूनच नंतर मतदानावेळी विविध ठिकाणी जोरदार राडे झाले. याचदरम्यान तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजप व शिवसेनेतला वाद विकोपाला गेला.

येथे पातळी सोडून दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोपांची झोड उडवून दिली. केसरकर यांनी थेट नाव घेणं टाळलं. मात्र निलेश राणेंनी चव्हाण यांनीच पैसे वाटपाचा खेळ खेळल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. यामुळे त्रासलेल्या चव्हाणांनी आपल्याला २ तारखेपर्यंत युती टिकवायचीय म्हणत बाँम्ब फोडला.

यावेळीही शांत न राहता निलेश राणेंनी चव्हाणांवर पलटवार केला होता. त्यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. यानंतरच चव्हाण यांनी थेट कोकणात जावून पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला होता. रवींद्र चव्हाण यांनी महायुतीतील वादावर भाष्य करताना, निवडणूकीनंतर आरोप प्रत्यारोपाचे विषय महायुती म्हणून थांबले पाहिजेत अशी भाजपची भावना असल्याचे सांगितले. तसेच याबाबत चर्चा झाली असून महायुतीतील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा झाली आहे. त्यांनीदेखील विषय अधिक वाढवू नये असं सांगितले आहे.

यामुळे लवकरच आम्ही सर्व जण देवेंद्र फडणवीस, मी आणि ते एकत्रित बसणार आहोत. जे घडलंय त्यावर आपण पडदा टाकला पाहिजे असं शिंदेंनी म्हटलं. त्यामुळे पक्षप्रवेशासह इतर मुद्द्यावर १०० टक्के चर्चा होईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. तसेच तूर्तास सर्व गोष्टींवर पडदा पडला पाहिजे, असे म्हटलं आहे.

यानंतर आता भाजपला सरळ घात घेणाऱ्या निलेश राणेंनी देखील आपली तलवार म्यान करत वाद थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणही आपले नेते आहेत, त्यांना नक्की भेटेन असे म्हणत वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्याशी उडणाऱ्या खटक्यावर भाष्य करताना, रवींद्र चव्हाण यांच्याशी आपले काहीही वैयक्तिक वाद नाहीत. निवडणुकीत मी माझ्या पक्षाचे काम करत होतो आणि रविंद्र चव्हाण त्यांच्या पक्षाचे. शिवाय टीका पक्षाच्या भूमिकेतून होती. रविंद्र चव्हाण यांच्यावर वैयक्तिक टीका केली नव्हती, असेही निलेश राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

याचवेळी त्यांनी भाजप नेत्यांवर केलेले आरोप पुराव्यासह केले असून तक्रारी मागे घेण्याचा प्रश्न येत नाही. शिवाय भाजपमधूनही कुणी तक्रार मागे घेण्यास सांगितलं नसल्याचेही निलेश राणे यांनी म्हटले. एकूणच शिवसेना आणि भाजप यांच्यातील निवडणुकीतील वाद आता कमी होताना दिसत असून लवकरच यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

FAQs :

1) महायुतीत वाद का उफाळून आला?
नगरपालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी, रणनीती आणि तळकोकणात पैशांचे वाटप केल्याचा आरोप यामुळे वाद निर्माण झाला.

2) वाद मिटवण्यासाठी कोण बैठक घेणार आहेत?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकत्रित चर्चा करणार आहेत.

3) शिंदेंनी चव्हाणांना काय सांगितले?
वादावर पडदा टाकून पुढे एकत्रितपणे लढावे अशी भूमिका त्यांनी चव्हाणांना कळवली.

4) निलेश राणे यांनी काय भूमिका घेतली आहे?
त्यांनी चव्हाणांशी कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचे सांगत महायुतीने एकत्र राहावे असे म्हटले.

5) वाद खरोखर शांत होईल का?
वरिष्ठ नेत्यांची बैठक आणि राणेंचा सौम्य भूमिकेमुळे वाद संपुष्टात येण्याची शक्यता जास्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT