Ramdas kadam sarkarnama
कोकण

हेच ते पत्र ज्यामुळे रामदास कदम अडचणीत आले

या पत्रामुळेच शिवसेना नेतृत्व रामदास कदमांवर नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

चिपळूण : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून ज्यांना मंत्रिपदे मिळाली, ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. शिवसेनेतील काही मंत्री आपल्याला बाजूला करत आहेत, अशी भावना शिवसेना नेते, आमदार रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली. काही महिन्यांपासून आपल्याला पक्षात दुर्लक्षित केले जात असल्याने आपण नाराज असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र, या पत्रामुळेच शिवसेना नेतृत्व रामदास कदमांवर नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यातूनच ते अडचणीत आले असून आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना डावलेले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Shiv Sena leader Ramdas Kadam got into trouble due to this letter)

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर आमदार कदम यांच्याशी ‘सरकारनामा’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, मला आता याविषयी काहीच बोलायचे नाही. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळ असायचे. ठाकरे यांच्यासोबत खास राजकीय संबंध असलेल्या नेत्यांमध्ये कदम हे नाव महत्त्वाचे होते. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर कदम यांचे वजन आणखी वाढले. त्यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरणमंत्री होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खासकरून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून कदम हे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून दुरावले आहेत.

मागील अधिवेशनात गृहविभागावर टीका

गेल्या वर्षी मुंबईत विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार कदम यांनी गृहविभागातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली होती. शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले गृहविभागातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा जाहीर आरोपही त्यांनी विधानसभेत केला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या विरोधात माहितीची रसद पुरवल्याचा आरोप कदम यांच्यावर करण्यात आला होता. सोमय्यांना माहिती पुरविल्याच्या आरोपामुळे कदम यांना शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात प्रवेश मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने मी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका कदम यांनी घेतली होती.

माझ्या बदनामीचे षडयंत्र पक्षात रचले

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या सहा पानी पत्रात आमदार कदम यांनी शिवसेनेच्या गोटातून मंत्री झालेलेच आपल्याला संपवण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत, याची विस्तृत माहिती दिली आहे. काही मंत्र्यांच्या नावांचादेखील पत्रात उल्लेख आहे. निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले जात असल्यामुळे मी नाराज आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावाही आमदार कदम यांनी पत्रात केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT