Mahendra Dalvi
Mahendra Dalvi sarkarnama
कोकण

शिवसेनेला मोठा धक्का; दळवींची आमदारकी धोक्यात?

महेंद्र दुसार

अलिबाग : अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (ShivSena) आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने (Court) एका जुन्या प्रकरणात दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालानंतर एकच खळबळ उडाली असून दळवी यांची आमदारकी टिकणार, की रद्द होणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी दळवी आणि त्यांच्या चौघा साथीदारांना ही शिक्षा ठोठावली आहे. हे प्रकरण 2013 मध्ये घडलेल्या होते. हे प्रकरण दळवी यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. दळवी यांचा जामीन मंजूर झाला असून या संदर्भातील शिवसेनेकडून पुढील भूमिका सोमवारी स्पष्ट केली जाणार आहे. (ShivSena latest news)

लोकप्रतिनीधीला जर न्यायालयाने दोषी ठरवत किमान दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यास त्या लोकप्रतिनिधीला पदावर राहता येणार नाही, तसेच पुढील सहा वर्षे निवडणुक लढवता येणार नाही, असा निकाल 10 जुलै 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती ए. के. पटनाईक व एस. जे. मुखोपाध्याय यांच्या न्यायालयाने 604/2004 या क्रमांच्या रीट याचिका क्रमांकावरच्या सुनावणी दरम्यान दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातून अलिबागचे विद्यमान आमदार दळवी यांची आमदारकी रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत.

मात्र, आमदारांचे समर्थक आमदारांना जामीन मिळाला असल्याने कार्यकर्त्यांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगत आहेत. सोशल मीडियावर देखील अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच दळवी यांनी आपला वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. दळवींवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शुक्रवारी दुपारच्या सत्रात जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.

दळवी यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सुभाष (पंडित) पाटील यांचा पराभव केला आहे. हा पराभव शेतकरी कामगार पक्षालाही चांगलाच जिव्हारी लागला होता. आता नऊ वर्ष जुन्या प्रकरणाच्या निकालाने त्यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2013 मध्ये थळ येथे किरकोळ कारणावरुन मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार बाबू उर्फ सलीम लालासाहेब दिगी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात केली होती.

त्यानुसार दळवी यांच्यासह अनिल हरिश्‍चंद्र पाटील, अंकुश द्वारकानाथ पाटील, मनोहर काशिनाथ पाटील, स्वप्नील उर्फ पप्पू दिलीप पाटील, रुपेश रामदास पाटील, अविनाश लक्ष्मण म्हात्रे, मिलिंद द्वारकानाथ पाटील, राकेश रामदास पाटील सर्व राहणार वायशेत, थळ यांच्यावर यांच्यावर 324, 143, 147, 148, 427, 504, 506 सह 149 नुसार त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायदा 3 (1) (10) (6) आणि मुंबई पोलिस अधिनियम 37 (1) (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. निकाल देताना प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश विभा इंगळे यांनी अनिल हरिश्‍चंद्र पाटील, अंकुश द्वारकानाथ पाटील, अविनाश लक्ष्मण म्हात्रे, महेंद्र हरि दळवी या चौघांना दोषी ठरवून 2 वर्षे आणि प्रत्येकी 27 हजार 100 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT