Narayan Rane News in Marathi, Maharashtra Political crisis
Narayan Rane News in Marathi, Maharashtra Political crisis 
कोकण

सेना पुन्हा उभी राहणार नाही, ठाकरे पितापुत्रांनी गप्प राहावे : नारायण राणेंनी मीठ चोळले

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : शिवसेनेवर (Shiv sena) आज उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केली.


गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने कोणते प्रश्न सोडवले, असा सवाल करत नवीन सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच लोक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले आदी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आता तोंड गप्प करावे. मुख्यमंत्री असतानासुद्धा स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाहीत, ते मतदार काय सांभाळणार? महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले, हे सांगा. उलट त्यांनी नारायण राणे यांच्या घराला नोटीस बजाविण्याचे काम केले. अडीच वर्षांमध्ये स्वतःच्या आमदार, खासदारांना आठ-आठ तास भेटण्यासाठी ताटकळ ठेवायचे. त्यांची कामे करायची नाहीत. केवळ ‘मातोश्री’च्या आप्तांचीच कामे करायची, हा एक कलमी भ्रष्टाचार त्यांनी केला.’’

ते म्हणाले, ‘‘मी वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे सांगत आलो होतो. कारण मला आधीच याची कल्पना होती. आता शिवसेनेच्या चिन्हावरून उभा राहिलेला प्रश्न कायद्याच्या बाबीवर अवलंबून आहे. येत्या ११ तारखेला होणाऱ्या निर्णयानंतर पुढील हालचाली घडून येतील. नवीन सरकार येथील जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच हे राज्य लोक कल्याणकारी राज्य बनावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.’’

नवीन मंत्रिमंडळामध्ये नीतेश राणे यांना संधी असेल का, याबाबत त्यांना विचारले असता त्याची यादी शिंदे आणि फडणवीस दिल्लीला घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले. मी मुख्यमंत्री असताना माझा दरारा होता. सभागृहामध्ये शिस्त ठेवली होती. आता केंद्रीय मंत्री पदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. येणाऱ्या काळात या ठिकाणी उद्योगधंदे व बेरोजगारी संपवावी, असे काम करणार, असे ते म्हणाले.

केसरकर प्रवक्ते म्हणूनच राहो!
शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर यांनी बजावलेली भूमिका याबाबत राणे यांना विचारले असता, मी अनेक प्रवक्ते बघितले. त्यापैकी केसरकर एक आहेत. केवळ प्रश्न विचारणे आणि उत्तर देणे हा त्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे केसरकर प्रवक्ते म्हणूनच राहोत, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT