Shiv Sena's corporators join Shinde group
Shiv Sena's corporators join Shinde group Sarkarnama
कोकण

मोठी बातमी : शिवसेनेचे नगराध्यक्ष अन ७ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; सामंतांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची संधी साधली

सरकारनामा ब्यूरो

लांजा (जि. रत्नागिरी) : लांजा तालुका शिवसेनेत (Shivsena) भूकंप झाला असून लांजा नगरपंचायतीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्ष मनोहर बाईत आणि सात नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट Eknath Shinde) जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे नगरपंचायतीवरील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली आहे. (Shiv Sena's council President and 7 corporators join Shinde group)

गेल्या अनेक दिवसांपासून लांजा शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात होती. लांजा नगरपंचायतीवर एकहाती सत्ता असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे काही नगरसेवक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.

नगरपंचायतीमधील उपनगराध्यक्ष तथा गटनेत्या पूर्वा मुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व नगरसेवक हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी ठाम असल्याचे जाहीर केले होते. या गोष्टीला १५ दिवसांचा कालावधी उलटतो ना तोच पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला आहे.

रत्नागिरीत शुक्रवारी (ता. १६ डिसेंबर) झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेविका दुर्वा भाईशेटे, वंदना काडगाळकर, समृद्धी गुरव, सचिन डोंगरकर, प्रसाद डोर्ले, मधुरा बापेरकर, सोनाली गुरव या सात नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुनील ऊर्फ राजू कुरूप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा झाला. नगरसेविका सोनाली गुरव या पक्षप्रवेशावेळी उपस्थित नव्हत्या. मात्र, पक्षप्रवेशाच्या यादीत आणि स्वतंत्र गटाच्या अर्जावर त्यांनी सही केली आहे.

लांजा नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी विकासाचा ध्यास घेऊन पक्षप्रवेश केला आहे. शहरातील प्रलंबित कामे आता जोमाने सुरू होतील, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत सहकार्य करणार आहेत, असे सामंत समर्थक राजू कुरूप यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT