Suryakant Dalvi-Ramdas Kadam-Anil Parab Sarkarnama
कोकण

सूर्यकांत दळवींना यापुढेही आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करू : परबांनी रामदास कदमांना पुन्हा डिवचले!

दापोलीत सूर्यकांत दळवी यांना बळ देण्याचे शिवसेनेचे संकेत

सरकारनामा ब्यूरो

दाभोळ (जि. रत्नागिरी) : दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीतील विजयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला असून पुढील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत हाच फॉर्म्यूला राबिवण्यात येणार असल्याचे सूतोवाच आज करण्यात आले. नगरपंचायत निवडणुकीतील विजयामुळे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांना मोठा आनंद झाला असल्याचे सांगत पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आम्ही सूर्यकांत दळवी यांना कायम आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करू, असे सांगत दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेतृत्व माजी आमदार दळवी यांचेकडेच आगामी काळातही राहील, असे संकेत त्यांनी दिले. (Shiv Sena's signal to give strength to Suryakant Dalvi in ​​Dapoli)

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे आणि माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यातील मोबाईलवरील कथित संभाषण उघड झाल्यावर शिवसेना नेतृत्वाने त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचीच परिणती दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार योगेश कदम यांना निर्णय प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्यात आले होते, तर शिवसेनेची सर्व जबाबदारी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या योगेश कदम समर्थकांनी शिवसेवा विकास आघाडी स्थापन करुन ही निवडणूक लढविली होती. मात्र, या आघाडीला केवळ २ जागांवर यश मिळाले. मंडणगड नगरपंचायतीत चांगले यश मिळाले, तेथे शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र, या दोन्ही नगरपंचायतींमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळाली आहे.

कोकणात अन्यत्र कोठेही आघाडी नसताना केवळ दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीसाठी ही आघाडी करण्यात आली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी शिवसेनेतर्फे, तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे या आघाडीचे शिल्पकार मानले जातात. दापोली विधानसभा मतदारसंघातील आमदार योगेश कदम यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी गेले सात वर्षे शिवसेनेत बाजूला असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी व त्यांचे समर्थक यांना बळ देण्यात आले आहे. माजी आमदार कदम यांचे दापोली विधानसभा मतदारसंघातील वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी ही आघाडी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सत्तेवर येताच राष्ट्रवादीच्या कदमांची कुणबी भवनाबाबत घोषणा

दापोली नगरपंचायतीमध्ये यापूर्वी शिवसेना आणि कॉंग्रेस यांचा प्रासंगिक करार झाला होता व ते सत्तेत होते. त्यात योगेश कदम यांचे समर्थक होते. दापोली नगरपंचायतीच्या मंजूर विकास आराखड्यातील जागा कुणबी समाज भवन बांधण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा दापोली या 100 वर्षे जुन्या संस्थेने मागितली होती. मात्र, या संस्थेला दापोली नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांनी ना हरकत न देता नव्याने स्थापन झालेल्या कुणबी समाजाच्या एका संस्थेला त्यासाठी ना हरकत दिले होते. आता नवीन नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा होईल, त्यात कुणबी समाजोन्नती संघाला ना हरकत देण्यासाठी विषय पत्रिकेवर प्राधान्याने हा विषय ठेवण्यात येईल व तो मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा माजी आमदार संजय कदम यांनी केली. या घोषणेमुळे कुणबी समाजात चांगला संदेश जाणार असून त्याचा उपयोग जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत आघाडीला होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT