Nitesh Rane-Satish Sawant Sarkarnama
कोकण

'नोकरीवरून काढण्याची धमकी देत कर्मचाऱ्यांचा भाजप प्रवेश केला जातोय...'

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक भाजपचा राजकीय अड्डा बनला आहे : सतीश सावंत

सरकारनामा ब्यूरो

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank) नव्या संचालक मंडळाचा शंभर दिवसांचा कारभार हा सर्वसामान्य बँक नोकरदारांची रोजीरोटी हिरवणारा ठरला आहे. शिवसेनेचे (shivsena) काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची भीती दाखवून त्यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून घेतला जात आहे. त्यामुळे जिल्हा बँक मुख्य कार्यालय हे भाजपचा राजकीय अड्डा बनला आहे, असा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत (Satish Savant) यांनी केला. (Sindhudurg District Bank has become a political haun of BJP : Satish Sawant)

कणकवली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आज (ता. २८ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष सावंत बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. या वेळी बँकेचे संचालक तथा नगरसेवक सुशांत नाईक, तालुका प्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले की, कणकवली तालुक्यातील करंजे, नागवे या गावातील सरपंच आणि माजी उपसरपंच या दोघांचे मुलगे बँकेमध्ये हंगामी कर्मचारी म्हणून होते. त्यांना कामावरून काढून टाकू; अन्यथा तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा, असे आमदारांनी धमकावले. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला जात आहेत. घोणसरीतील एका कार्यकर्त्यांना पंधरा लाखांची कर्ज माफ करू, असे सांगून त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश करून घेतला जात आहे. त्यामुळे नोकरी बचाव भाजप बढाव असा नारा देत राणे बीजेपी वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो.

मी बँकेत कधीही पक्षीय राजकारण केले नाही. किंबहुना यापूर्वी शिवरामभाऊंपासून जे जे चेअरमन झाले, त्यांनी कधीही बँकेच्या पदाचा पक्षासाठी चुकीच्या पद्धतीने वापर केलेला नाही. काही कर्जदारांना धमकावून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वैभववाडी पंचायत समितीच्या एका माजी सदस्यांच्या मुलाला बँकेतून काढून टाकू; अन्यथा तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा, असे सांगण्यात आले आहे. भाजप वाढवण्याची नीतेश राणे यांची पद्धत ही घातक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बँकेचा चुकीचा वापर राजकीय पक्षासाठी केला जात आहे, असे आरोप माजी अध्यक्ष सावंत यांनी केले.

बँकेच्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रार करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधातही आम्ही सहकार मंत्र्यांना माहिती देणार आहोत. ज्या बोलेरो गाड्यांचे थकीत कर्ज होते, अशा कर्जदारांना १०१ ची कारवाई केली आहे. त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यासाठी एकीकडे सत्ताधारी अडवणूक करीत आहेत. प्रशासनावर ही कारवाई न होण्यासाठी दबाव आणला जात आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षाच्या कर्जदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत सहकार आयुक्तांकडेही आम्ही तक्रार करणार आहेत. जिल्हा बँकेत नियमाप्रमाणे नोकरभरती व्हावी. हा नोकर भरतीचा अधिकार राज्य सरकारला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आम्ही भेट घेऊन नोकरभरती व्हावी, अशी मागणी करणार आहोत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शंभर दिवसांच्या कारभारामध्ये चुकीच्या पद्धतीने वाटचाल सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची बँक टिकली पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्या बँकेचा कारभार हा राजकीय पक्षासाठी सुरू आहे. नीतेश राणे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन कोटी ७० लाख देण्याचे आश्वासन दिले होते. पण, शेतकऱ्यांचे हे थकीत पैसे अद्याप मिळालेले नाहीत. हे पैसे वेळीच न मिळाल्यास जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा सतीश सावंत यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT