सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कणकवली, मालवण आणि वेंगुर्ले येथे मतदानाआधी मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याचा आरोप समोर आला.
निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर एका मताचा दर 25 हजारांपर्यंत गेला असल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली.
चारही ठिकाणी कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याची चर्चा असून अनेक पक्ष या बाजारात उतरल्याचे मानले जाते.
Sindhudurg News : शिवप्रसाद देसाई
नुकताच जिल्ह्यातील तीन पालिका आणि एका नगरपंचायतीबरोबरच नगराध्यक्ष पदासाठी मतदान पार पडले. यावेळी मतदारांनी देखील चुरस दाखवली. पण आता जिल्ह्यात झालेल्या अमाप 'लक्ष्मी' दर्शनाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने निवडणूक यंत्रणा चोख ठेवली असतानाही, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन आणि थेट जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरल्यानंतरही येथे 'लक्ष्मी' दर्शन घडविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्गात सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या पालिका व कणकवली नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला. गेला आठवडाभर खास यंत्रणा लावून बहुसंख्य मतदारांपर्यंत पैशाचे पाकीट पोहोचवण्याची स्पर्धाच सुरू होती.
यात सावंतवाडी आणि कणकवली या शहरांमध्ये सर्वाधीक वाटप झाले. जिल्ह्यात अमाप 'लक्ष्मी' दर्शन घडविण्यात आले. एका मतासाठी सर्वोच्च दर अगदी 25 हजारांपर्यंत पोहोचला. पैसे वाटपाच्या या बाजारात जवळपास सगळेच पक्ष कमी-अधिक प्रमाणात उतरले. जिल्ह्यातील चार ठिकाणी आठवडाभरात कोट्यवधी रुपयांचे वाटप झाल्याचेही चर्चा आहे.
दरम्यान आता पैसे वाटपासाठी वेगळी व्यवस्था तयार करण्यात आल्याची चर्चा असून यात मतदारांची साधारण तीन प्रकारात विभागणी करण्यात आली होती. त्यापद्धतीने आधीच होमवर्क पूर्ण झाले होते. पहिल्या प्रकारात हमखास मत देणारे, दुसऱ्यात आपल्याकडे खेचता येतील असे आणि तिसऱ्या वर्गात आपल्याकडे वळणारच नाही अशा मतदारांचा समावेश होता.
प्रभागातील चुरस कशी आहे, यावर एका मताचा दर ठरत होता. जिल्ह्यातील एका शहरातील प्रभागात हा दर सर्वाधिक म्हणजे मताला 25 हजार इतका दिला गेला. येथे काही ठराविक मतदारांना तर 35 हजारांपर्यंत पैसे पोहोचले. या प्रभागात एक बडा नेता नगरसेवक पदासाठी उभा आहे. त्याला पाडण्यासाठी समोरच्या पक्षाने ताकद लावली होती. यातूनच हा दर 10 हजारांपासून वाढत 25 हजारापर्यंत पोहोचला. इतर ठिकाणी मताला 5 हजारापासून बोली लावली गेली.
पैसे वाटपाचा खेळ हा पाहिल्यानंतर समोर आलेले चित्र म्हणजे लोकशाहीचे धिंडवडे आहेत. यानितिमत्ताने राजकीय पक्ष, नेते आणि मतदार अशा कोणाकडेच राहिली नसल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल. हा प्रकार घातकी आहे. कधी कधी वाटते की हा निवडणुकीचा स्टंट करण्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांचा लिलावच केलेला बरा.- अशोक करंबेळकर, राजकीय विश्लेषक
FAQs :
1. सिंधुदुर्गात पैशांच्या वाटपाची चर्चा का रंगली?
निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशननंतर मोठ्या प्रमाणात पैसे मतदारांना दिल्याचे आरोप समोर आले.
2. एका मताचा दर किती होता?
स्थानिक चर्चेनुसार तो थेट ₹25,000 पर्यंत गेला होता.
3. कोणत्या शहरांमध्ये वाटप सर्वाधिक झाले?
सावंतवाडी आणि कणकवली या शहरांमध्ये सर्वाधिक वाटप झाल्याचे सांगितले जाते.
4. हा बाजार कोणत्या पक्षांनी लावला?
आरोपानुसार जवळपास सर्वच पक्ष कमी-अधिक प्रमाणात सहभागी असल्याचे म्हटले जाते.
5. किती पैशांचे वाटप झाल्याचा अंदाज आहे?
चार ठिकाणी मिळून कोट्यवधी रुपयांचे वाटप झाल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.