Sindhudurg politics : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापलं आहे. एकमेकांना राजकीय शह देण्यासाठी उमेदवारांना टार्गेट केलं जात आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथं उमेदवार 25 लाख रुपयांना विकले गेल्याचे बॅनर लागल्याने खळबळ उडाली आहे.
या बॅनरवर उमेदवारांचे फोटो आहेत. ही बॅनरबाजीमागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा आता रंगली आहे. थेट उमेदवारांच्या प्रतिमेला तडा केल्याने कायदेशीर कारवाई होणार का? याकडे आता लक्ष लागलं आहे.
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जिल्ह्यात अनेकांनी आपापल्या सोयीनुसार राजकीय पक्षप्रवेश करत राजकारण साधलं आहे. यातून एकमेकांविरोधात राजकीय बॅनरबाजी सुरू केली आहे.
अशातच, '25 लाखांसाठी हे उमेदवार विकले गेले आहेत', अशा आशयाचे, अन् त्यावर सहा उमेदवारांचा फोटो असलेले, बॅनर झळकले आहेत. हे बॅनर मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कणकवली तालुक्यातील वागदे इथं रात्री ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरच्या तळाला, पण 'आम्ही मात्र स्वाभिमानाने मतदान (Voter) करणार!' असे देखील लिहिले आहे.
या बॅनरची सध्या कणकवलीमध्ये जोरदार चर्चा असून, बॅनरचे फोटो अन् व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहेत. ही बॅनरबाजी नेमकी कोणी केली, यावर वेगवेगळ्या चर्चा आहे. अशी बॅनरबाजी म्हणजे, उमेदवारांच्या प्रतिमेवर थेट हल्ला आहे. यातून निवडणुकीविषयी त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. अशी बॅनरबाजी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा सूर अळवला जात आहे.
ही बॅनरबाजीमागे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा आहे. यातून फक्त उमेदवारांची बदनामीचा हेतू आहे, असे देखील बोलले जात आहे. उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांची राजकीय कारकिर्दीचा कोणताही उल्लेख नाही, फक्त फोटो वापरले असल्याने, यामागे फक्त बदनामीचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50, तर जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या 100 जागांसाठी निवडणूक 7 फेब्रुवारीला होणार आहे. जिल्हा परिषदेच्या आठ ठिकाणी एकच अर्ज राहिला आहे, तर पंचायत समितीच्या 17 जागी एकच अर्ज राहिल्यामुळे या जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या 42 जागांसाठी 115 उमेदवार तर, पंचायत समितीच्या 83 जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत.
बिनविरोध निवड झालेले सर्व उमेदवार हे महायुतीचे आहेत. जिल्हा परिषदेच्या आठ पैकी सात उमेदवार भाजप, तर एक उमेदवार हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा आहे. तर पंचायत समितीचे बिनविरोध निवड झालेले सर्व 17 ही सदस्य भाजपचे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे बिनविरोध निवडी झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.