narayan rane sarkarnama
कोकण

गद्दारी मी सहन करणार नाही ; नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

नारायण राणे (narayan rane) यांनी आपल्या पराभवाची आठवण करुन दिली. ते म्हणाले, ''येत्या निवडणुकीत मी कोणतीही गद्दारी सहन करणार नाही,'' असा दम त्यांनी भाजपच्या कार्यक्रर्त्यांना भरला.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : आपले पुत्र निलेश राणे यांनी पुन्हा विधानसभेवर पाठविण्यासाठी भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कंबर कसली आहे. कुडाळ मालवण मतदार संघासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडुकीच्या पूर्वतयारीसाठी त्यासाठी कुडाळ येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात राणेंनी कार्यक्रर्त्यांना दम भरल्याची चर्चा मेळाव्यानंतर रंगली आहे.

आपल्या भाषणात नारायण राणे (narayan rane) यांनी आपल्या पराभवाची आठवण उपस्थितांनी करुन दिली. ते म्हणाले, ''येत्या निवडणुकीत मी कोणतीही गद्दारी सहन करणार नाही,'' असा दम त्यांनी भाजपच्या कार्यक्रर्त्यांना भरला. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी यावेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीरपणे सांगितले.यावेळी निलेश राणे यांनी ''२०२४ची निवडणूक मीच जिंकणार'' असा पुन्हा निर्धार केला आहे.

निलेश राणे म्हणाले, की, आता आपणाला विरोधकांच्या विजयाच्या गुलाल उधळलेला बघायचा नाही तर आता फक्त आणि फक्त भाजपच्या विजयाचा गुलाल उधळायचा आहे, विरोधक आत्मनिर्भर होता कामा नयेत, ते स्थिर होता नयेत, यासाठी आपण काम केले पाहिजे. येत्या २०२४ ची निवडणुकीत मलाही येथून जिंकायचे आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र झाले आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागले पाहिजे.

नारायण राणे म्हणाले, ''सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शंभर टक्के यश मिळालं, हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापर्यंत जायला हवा, अशा पद्धतीने एका निष्ठेने काम करा, येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत गद्दारी, फितुरी मी सहन करणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झालं ते मी सहन केलं पण आगामी निवडणुकीत जर कुणी गद्दारी केली... याला पाडा... याला अमूक करा, तमूक करा...असे उद्योग केले तर पाहाच...गद्दाराला पक्षातून काढून टाकणं सोपं आहे पण नकोत्या गोष्टी घडू नयेत याची काळजी सगळ्यांनी घ्या. गद्दारी मला नाही चालणार... मी ती चालू देणार नाही,''

कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव निलेश राणे, राजन तेली यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज होण्यास सांगितलं व स्पष्ट शब्दांत इशाराही दिला. 'पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठिशी सगळ्यांनी खंबीरपणं उभं राहायचं पाहिजे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. पुढच्या निवडणुकीत त्यांचा विचार केला जाईल. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही राणे यांनी कार्यक्रर्त्यांनी सांगितले.

'मला काय गरज आहे या सगळ्याची. मी घरी आरामात राहू शकतो. माझे व्यवसाय चांगले चालू आहेत, केवळ पक्षासाठी मी काम करीत आहे, असे नाराण राणे यांनी यावेळी सांगितले. पक्ष तुम्हाला सगळं काही देतो मग पक्षाचं हित जपणं तुमचं कर्तव्य नाही का? हा जिल्हा शंभर टक्के नारायण राणे यांच्यासोबत आहे हे तुम्ही दाखवून द्या. येणाऱ्या निवडणुका जिंकून राणेंच्या जिल्ह्यात शंभर टक्के भाजप आहे, हा संदेश पक्ष नेतृत्वापर्यंत जायला हवा, असे राणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT