Sunil Tatkare-Bhaskar Jadhav
Sunil Tatkare-Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

तटकरेंनी शब्द पाळावा; त्यांच्या उमेदवारांच्या पाठीशी माझी व शिवसेनेची ताकद उभी करेन!

सरकारनामा ब्यूरो

चिपळूण : विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे. त्यांनी आपला शब्द पाळल्यास कुणबी समाजाच्या उमेदवारामागे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना आणि माझी ताकद उभी करेन, असे शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी (ता. २० नोव्हेंबर) सांगितले. कुणबी समाजावर प्रेम व्यक्त करण्याची नामी संधी तटकरेंनी सोडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. (Sunil Tatkare should give up seat of Konkan Legislative Council to Kunbi community : Bhaskar Jadhav)

शिवसेनेचे आमदार जाधव म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेमध्ये असताना कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा पक्षाला मिळवून दिली होती. मी विधानसभेत निवडून गेल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणानुसार ही जागा रत्नागिरी जिल्ह्याला मिळायला हवी होती. परंतु जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे ही जागा रायगडमध्ये गेली. आता खासदार सुनील तटकरे यांनी कुणबी समाजाच्या माध्यमातून ही जागा परत जिल्ह्याला देण्याचे आश्वासन दिले आहे. मी त्याचे स्वागत करतो.

मुंबईमध्ये कुणबी भवन बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीतून पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत. या कामासाठी अतिरिक्त निधी लागला, तर आम्हीही शिवसेनेच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. परंतु राज्याच्या तिजोरीतून या कामासाठी पैसे देणे हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अर्थमंत्री अजित पवार यांना निश्चितच आवडले नसेल, असेही आमदार जाधव यांनी नमूद केले.

‘‘तटकरे यांनी कुणबी भवनला निधी देण्याच्या बदल्यात शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला त्याचे आम्हाला दुःख नाही, परंतु जिल्ह्यातील कुणबी समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले आहे. त्याचे मी स्वागत करतो. त्यांनी ही जागा कुणबी समाजासाठी सोडावी. म्हणजे समाजालाही कळेल, की तटकरे यांचे घराण्यापेक्षा कुणबी समाजावर अधिक प्रेम आहे,’’ असा खोचक टोलाही भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीचे खासदार तटकरे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT