NCP Split : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
सुनील तटकरे म्हणाले, "दोन्ही राष्ट्रवादीच्या (NCP) विलीनीकरणाच्या चर्चा करायच्या असतील, तर त्या वर्षा बंगल्यावर जाऊन का होतील?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती, असा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले नसते, तर 12 किंवा 15 फेब्रुवारी 2026 रोजी दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते.
तटकरे यांनी सांगितले की, त्या वेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांकडूनही नियोजन करण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती आणि समीकरणे पूर्णपणे बदलली.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांचा उल्लेख करत तटकरे म्हणाले की, त्या प्रक्रियेची जबाबदारी अजित पवार स्वतः पाहत होते. ते पक्षाचे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांनी या चर्चांबाबत काही माहिती दिली होती. "काय चर्चा सुरू आहे, कोणता फॉर्म्युला ठरत आहे, याची काही प्रमाणात माहिती त्यांनी मला दिली होती. तो फॉर्म्युला मला माहित आहे," असे तटकरे यांनी सांगितले.
सध्या मात्र दोन्ही गटांकडून संघटन बांधणीवर भर दिला जात असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शरद पवार गटाकडूनही संघटन विस्ताराचे काम सुरू आहे आणि दोन्ही बाजूंनी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीचा आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा संबंध जोडणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.