Badlapur Municipal Council Bill Dispute : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपरिषदेच्या मुख्यालयात कामांच्या बिलांवरून झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले.
शिवसेना शाखाप्रमुख तथा ठेकेदार भरत नवगिरे आणि भाजपचे नगरसेवक व नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांच्यात हा वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी रखडलेल्या कामांच्या बिलांबाबत चर्चा करण्यासाठी भरत नवगिरे बदलापूर नगरपरिषदेत आले होते. यावेळी बिलांच्या मंजुरीवरून नवगिरे आणि संभाजी शिंदे यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. व्हायरल व्हिडिओमध्ये धक्काबुक्कीच्या वेळी (BJP) संभाजी शिंदे पालिकेच्या आवारातील जिन्यावरून खाली कोसळताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी प्रसंगावधान राखत त्यांना सावरल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. या घटनेत शिंदे यांना दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.
कामांची बिले मंजूर करण्यासाठी 25 ते 50 टक्के ‘टक्केवारी’ची मागणी केली जात असल्याचा आरोप ठेकेदार भरत नवगिरे यांनी केला आहे. राजकीय वैमनस्यातून पालिकेतील (Municipal Council) आपली कामांची बिले जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच विविध समित्यांच्या सभापतींकडून बिले मंजूर करण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नवगिरे यांनी धक्काबुक्की झाल्याची बाब नाकारलेली नाही. ‘पालिकेतील रखडलेल्या बिलांबाबत विनंती करण्यासाठी मी सभापती संभाजी शिंदे यांच्याकडे गेलो होतो. बिले मंजूर करण्यासाठी टक्केवारी मागितली. संताप अनावर झाल्याने त्यांना धक्काबुक्की झाली, ही बाब मी नाकारत नाही. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचे सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे,’ असे नवगिरे यांनी म्हटले.
दरम्यान, संभाजी शिंदे यांनी नवगिरे यांचे टक्केवारीचे आरोप खोडसाळ आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. टक्केवारीची मागणी केली असल्याचे आरोप करणाऱ्यांनी त्याचे पुरावे सादर करावेत, असे आव्हान त्यांनी दिले. ‘भरत नवगिरे यांनी केलेले आरोप अत्यंत खोडसाळ आहेत. आम्ही टक्केवारीची मागणी केली असेल तर त्यांनी त्याचे पुरावे सादर करावेत. त्यांनी मला धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला असून, या घटनेत मला दुखापत झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी शिंदे यांनी केली.
संभाजी शिंदे यांनी नवगिरे यांच्या काही कामांची बिले खोटी असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बदलापूर नगरपरिषदेतील या वादातून केवळ धक्काबुक्कीच नव्हे, तर कामांची रखडलेली बिले, कथित टक्केवारीची मागणी, बिलांच्या सत्यतेवरील प्रश्न, ठेकेदारी आणि स्थानिक राजकीय संघर्ष हे मुद्देही चर्चेत आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.