Diva Drug Bust Sarkarnama
कोकण

Diva Drug Bust : दिव्यातील सोसायटीत परदेशी नागरिकांचा ड्रग्जचा अड्डा! 11 कोटींचे कोकेन-एमडी जप्त

Mumbra Police seized cocaine and MD drugs worth Rs 11 crore from a flat in Diva, Thane. Three foreign nationals, including a Nigerian couple, are named in the case : मुंब्रा पोलिसांचा औरा इमारतीतील फ्लॅटवर छापा; नायजेरियन दाम्पत्यासह टांझानियाच्या एका नागरिकाला अटक, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा तपास सुरू

Pradeep Pendhare

Thane Drug Seizure : ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात अंमली पदार्थविरोधी कारवाई करत मुंब्रा पोलिसांनी सुमारे 11 कोटी रुपये किमतीचे कोकेन आणि मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे.

या प्रकरणी टांझानियाच्या एका आणि नायजेरियाच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दिवा पूर्वेकडील बेतवडे गावातील मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड सोसायटीमधील औरा इमारतीतील एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.

मुंब्रा पोलिस ठाण्याचे अंमलदार नवनाथ थोरवे यांना बेतवडे येथील एका सोसायटीत परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थांची (Drugs Case) विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ निरीक्षक गणेश जावदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन ढगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने संबंधित सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकला.

पंच आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत पोलिसांनी (Police) फ्लॅटची झडती घेतली. यावेळी फ्रिजवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यात पांढऱ्या रंगाची पावडर असलेल्या अनेक पिशव्या आढळल्या. तपासणीत या पावडरमध्ये कोकेन आणि मेफेड्रोन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी या कारवाईत एकूण 1 किलो 278.5 ग्रॅम कोकेन आणि एमडी जप्त केले. याशिवाय रिकामे प्लास्टिक पाऊच, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दोन मोबाईल फोन, पासपोर्ट आणि 7 हजार 600 रुपयांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 11 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी नायजेरियन नागरिक चुकवुएमेका इमॅन्युएल न्वाक्वो (वय 41) आणि त्याची पत्नी युकेरिया चुकवुएमेका ओबियानुजू (वय 41) यांच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय एका टांझानियन नागरिकालाही अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी या कारवाईची माहिती दिली.

दिवा परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे अंमली पदार्थ नेमके कुठून आणले जात होते, त्यांचा पुरवठा कोण करत होते आणि स्थानिक पातळीवर त्यांची विक्री कोणामार्फत केली जात होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कशी संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT