Mahendra Dalvi, Kirit Somayya, Bharat Gogawale
Mahendra Dalvi, Kirit Somayya, Bharat Gogawale sarkarnama
कोकण

सोमय्यांचे सासुरवाडीत `स्वागत` करण्यासाठी शिवसेनेच्या तीन आमदारांची जय्यत तयारी!

सरकारनामा ब्युरो

रायगड : मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले दाखविण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या तेथे जात आहेत. यावरून रायगडचे शिवसेनेचे तीन आमदार व शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आमदार महेंद्र दळवी यांनी सोमय्या अलिबागचे जावई असून ते जर उतमात करत असतील तर जावयाला परत पाठविणे अलिबागकरांना येते, असा इशारा दिला आहे. तर आमदार भरत गोगावले यांनी सोमय्यांची प्रसिध्दीची नशा उतरवण्यासाठी रायगडचे शिवसैनिक 'रायगड स्टाईल' ने उत्तर देतील, असा इशारा दिला आहे.

मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर संपत्ती असून, त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. याबद्दल त्यांनी तक्रारही केली असून, तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी ते उद्या (शुक्रवारी) कोर्लई गावात जाणार आहेत. सकाळी ते आठ वाजता मुंबईतून अलिबागला जाणार असून, कोर्लई ग्रामपंचायत, रेवदंडा पोलिस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सोमय्यांना अडविण्यासाठी शिवसेनेचे तीन आमदार व शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बदद्ल नाहक बदनामीचा प्रयत्न सोमय्या यांनी केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पहात आहोत, असेही या आमदारांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र दळवी म्हणाले, त्यांना सरपंचांनी योग्य उत्तर दिलेले आहे. तरी देखील सोमय्या येथे येऊन उतमात करणार असतील. तर एक ते अलिबागचे जावई आहेत. जावयाला परत पाठविणे अलिबागकरांना नक्की येते. त्यांनी सन्मान करून थांबावे. सरपंचांनी पूर्ण माहिती त्यांना दिलेली आहे. तो जुन्या मालकाचा विषय होता. आज जागेवर काहीही दिसत नाही. तरीही सोमय्या हे उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी करण्यासाठी येत आहेत. त्यांनी येऊ नये. त्यातूनही हिंमत असेल तर त्यांनी यावे त्यांना योग्य उत्तर मिळेल, असा इशारा त्यांनी दिला.

तर आमदार भरत गोगावले म्हणाले, पक्ष प्रमुखांचा आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या पध्दतीने चालू. उद्धव साहेबांनी सांगितले जय महाराष्ट्र करा. तर आमची तयारी आहे. साहेबांनी सांगितले की 'स्लो' तरी आमची तयारी आहे. आम्ही सर्व माहिती घेतलेली आहे. रश्मी ठाकरे यांचे येथे कोणतेही बंगले नाहीत. केवळ प्रसिध्दी मिळवायच्या सवयीतून सोमय्या हे सर्व करत आहेत. त्यांची प्रसिध्दीची नशा संजय राऊतांनी बऱ्यापैकी उतरवली आहे. उरलेली प्रसिध्दीची नशा आम्ही रायगडचे शिवसैनिक उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांना 'रायगड स्टाईल'ने शिवसैनिक उत्तर देतील. आम्ही शिवसेनेचे तीन आमदार व शिवसैनिक आहेत. त्यांनी येथे येऊन उद्धव ठाकरेंची नाहक बदनामीचा प्रयत्न केला. तर, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT