Shivsena UBT Protest Sarkarnama
कोकण

Shivsena UBT : कर्जत प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड ठाकरेंच्या शिवसेनेनं बंद पाडली, वनखात्यानेही दिलं स्पष्टीकरण

Torrent Power Karjat Hydro Project : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टोरेंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पावरून वाद पेटला असून येथील वृक्षतोडी केली जात आहे. यावरून विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे.

सरकारनामा ब्युरो

Raigad News : कैलास म्हामले

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रविवारी (२५ ऑक्टोबर) वृक्षतोड सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन घोषणाबाजी केली. तसेच वृक्षतोडीला विरोध करत झाडे तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना जंगलाबाहेर काढल्याचा दावा करण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी तैनात होते. या प्रकल्पासाठी शंभर वर्षांहून अधिक काळ उभी असलेली झाडे तोडली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान राज्याच्या वन विभागाने याबाबत प्रेस नोट काढत स्पष्टीकरण दिले आहे.

विभागाने, मागील २ ते ३ दिवसांपासून भीमाशंकर अभयारण्यामध्ये एका कंपनीच्या प्रकल्पासाठी अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या सोशल मीडिया व विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झालेल्या आहेत. मात्र भीमाशंकर अभयारण्यामध्ये अशा प्रकारे कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नाही. तरी सर्व नागरीकांनी याबाबतची नोंद घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

३२ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार?

दरम्यान कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीचा साई डोंगर-१ हा ३,००० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ३२,४८० झाडे तोडली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे जंगल, जैवविविधता आणि वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. ॲड. कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी यापूर्वीही या वृक्षतोडीला विरोध केला आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेनेही या आंदोलनात सहभाग घेतल्याने हा मुद्दा राजकीय पातळीवर अधिक चर्चेत आला आहे.

राज ठाकरेही कर्जतमध्ये सभा घेणार

या प्रकल्पावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या प्रकल्पस्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेणार आहेत. तसेच आदित्य ठाकरे सोमवारी (२६ ऑक्टोबर) या परिसराला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही कर्जत येथे सभा घेणार आहेत. त्यामुळे वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून रायगडसह संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मनसेकडूनही आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकल्पाबाबत विरोधकांकडून ‘फेक नरेटिव्ह’ पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खोटे कथानक उभे करणे म्हणजे महाराष्ट्रविरोधी कृत्य असल्याचेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीविका नष्ट होणार नसल्याचे स्पष्टीकरण देताना फडणवीस यांनी सांगितले की, हा प्रकल्प एका दिवसात मंजूर झालेला नाही. त्यासाठी १८ महिने सुनावणी झाली असून, संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पडली आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावाही त्यांनी केला.

वृक्षतोडीवरून संघर्ष आणखी तीव्र होणार?

एकीकडे राज्य सरकारकडून प्रकल्पाचे समर्थन केले जात असताना दुसरीकडे विरोधक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांकडून वृक्षतोडीला विरोध केला जात आहे. त्यातच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यांमुळे या मुद्द्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आता प्रशासन वृक्षतोडीबाबत काय भूमिका घेते, विरोधकांच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत पुढे काय निर्णय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT