Ratnagiri News : काही दिवसांपूर्वीच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यानंतर काहीच दिवसांत दापोलीतही ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची कुजबुज कोकणात सुरू होती. दापोलीचे माजी आमदार संजय कदम हे राजकीय वारं ओळखून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. त्याचीच कुणकुण लागल्यामुळे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तडकाफडकी रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय कदमांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी केली आहे.
माजी आमदार संजय कदम हे उध्दव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्यावर शुक्रवारी(ता.7)त्यांची हकालपट्टी करत बाहेरचा रस्ता दाखवला आहे.धक्क्यावर धक्के बसत असतानाच ठाकरेंनी संजय कदमांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाची कुणकुण लागताच मोठी कारवाई केली आहे.
त्याआधीच शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) कारवाईचा बडगा उगारला आहे. यावेळी त्यांच्यावर पक्षानं पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला आहे. कदम यांच्या हकालपट्टीचा आदेश शिवसेना मध्यवर्ती कार्यालयानं प्रसिध्दीपत्रक काढत दिली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता संजय कदम यांचा शिंदेसेनेतील पक्षप्रवेशा निश्चित मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. यात बैठकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत स्नेहभोजन केलं. यानंतर संजय कदम यांची आपली पुढील राजकीय वाटचालीची दिशा बदलण्याचा निर्णय घेण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
संजय कदम आणि रामदास कदम यांच्यात पालखी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांचा मुंबईत लवकरच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान,आता राजन साळवीनंतर आता संजय कदम हे उध्दव ठाकरेंची साथ सोडणार असल्यानं कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं चर्चा कोकणच्या भूमीत रंगली होती.
काही दिवसांपूर्वीच दापोलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रामदास कदमांनी टीकेची तोफ डागली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव सांगणार नाही, अशी शपथतच घेतली होती.
शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम आणि माजी आमदार संजय कदम हे दोघंही कट्टर राजकीय विरोधक राहिले आहे. या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही.तसेच एकमेकांचं राजकारण संपवण्यापर्यंत टीका केली आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संजय कदमांचा रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी दारुण पराभव केला होता. यानंतर योगेश कदमांना मंत्रिपदही मिळालं. त्याचमुळे राजकीय शत्रुत्व संपवत संजय कदम यांनी एक पाऊल माघारीचं टाकलं आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.