Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Konkan News : रामदास कदमांच्या होम ग्राऊंडवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; संजय कदम स्वगृही परतणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे कोकणात नव्याने राजकीय फेरजुळणी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

सरकारनामा ब्यूरो

चिपळूण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ५ मार्चला कोकणात येणार आहेत. खेड येथील गोळीबार मैदानावर त्यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे कोकणात नव्याने राजकीय फेरजुळणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. (Uddhav Thackeray Sabha in Khed on March 5)

कोकण हा शिवसेनेचा गेली सुमारे ३०-३५ वर्ष बालेकिल्ला राहिला आहे. त्यातही तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची पूर्वापार मुंबईशी नाळ जोडलेली असल्याने इथे नेहमीच ठाकरे गटाला पाठिंबा मिळत आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या गटाचे वर्चस्व अलीकडेपर्यंत अबाधित होते; पण गेल्या वर्षी रत्नागिरीचे मंत्री उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे आमदार चिरंजीव योगेश हे‌ शिंदे गटाला मिळाल्याने जिल्ह्याच्या दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भागांमध्ये या वर्चस्वाला सुरूंग लागला आहे.

त्याचबरोबर २००५ ला सध्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे बाहेर पडल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हादरा बसला. सुमारे १० वर्षांच्या परिश्रमातून त्यावर मात करत ठाकरे गटाने तिथे पुन्हा आपली पकड बसवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनपैकी दोन आमदार या गटाचे होते; पण त्यापैकी दीपक केसरकरांनी १० वर्षांत दुसऱ्यांदा रंग बदलल्याने आमदार वैभव नाईक यांना एकाकी लढत द्यावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर कदम पिता-पुत्रांचं घरचं मैदान असलेल्या खेडमध्ये मेळावा घेऊन ठाकरे कोकणात नव्याने राजकीय फेरजुळणी करू पाहत आहेत. आक्रमक शैलीचे माजी आमदार संजय कदम यांच्या रूपाने कदम पिता-पुत्रांच्या परंपरागत राजकीय विरोधकांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील रामदास कदम यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्याची खेळी उघडपणे दिसत आहे. त्याचबरोबर, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असलेली संभ्रमावस्था आणि अस्वस्थता दूर‌ करून नवं बळ देण्याचा प्रयत्न या निमित्ताने ठाकरे स्वाभाविकपणे करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT