Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Thackeray warning to Gogawale : भगव्याला कलंक लावणाऱ्यांना महाडच्या पवित्र मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : ठाकरेंचा गोगावलेंना इशारा

निष्ठा कशाला म्हणतात, हे तानाजी मालुसरे यांच्याकडून शिकावे.

सरकारनामा ब्यूरो

महाड : महाड मतदारसंघ हा शिवसेनेचा आणि भगव्याचा आहे. महाडमध्ये शिवतर घळ, उमरट, चवदार तळे, मुरारबाजींचे स्मारक आहे. एवढं सगळ असल्यावर भगव्याला कलंक लावण्याची कुणाची हिम्मत आहे. भगव्याला कलंक आणि डाग लावणाऱ्यांना माहिती नाही. इकडं पवित्र मातीसुद्धा आहे. त्या मातीत राजकारणामध्ये तुम्हाला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. निष्ठा कशाला म्हणतात, हे तानाजी मालुसरे यांच्याकडून शिकावे. मेलो तर बेहत्तर आणि भगव्याशी गद्दारी करणार नाही, असे ते वागले. अशी ही महाडची माती आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना नाव न घेता इशारा दिला. (Uddhav Thackeray's warning to Bharat Gogawale)

महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना बंडखोरांवर पुन्हा एकदा शरसंधान साधले.

ते म्हणाले की, माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरी मिळत नाही. त्याचंही मला समाधान आहे; कारण माझ्यामुळे त्यांना भाकरी मिळते, हेही नसे थोडके. स्नेहल जगताप यांनी आग्रहच धरला आणि आज महाडमध्ये सभा घेतली आहे. काहींच्या पोटात गोळा उठला. पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नव्हे; तर एक लाख टक्के जप्त होणार, मग कसं होणार. स्नहेल जगताप काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या, शिवसैनिकांचं काय होणार. काय होणार म्हणजे, आपल्यातील गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावर चढवला नाही का. पण, तसं आपण काही करत नाही. आपण काहीही न देता, त्या आपल्याकडे आल्या.

आर्श्चय वाटतं की सत्ता असते तिकडे लोकं जातात. पण माझ्याकडे तर सत्ता नाही. पाठीमागून वार तर आपल्याच लोकांनी केला. गद्दारी केली आणि शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचले आणि स्वतः तिकडे बसले. त्यांना भाजपने फूस लावली, त्यांनी एवढा नीच डाव केला की आपली शिवसेना, धनुष्यबाण चोरून गद्दारांच्या डोक्यावर मारला. मी केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊनच मी तुमच्याकडे आलो आहे, तरीदेखील तुम्ही माझ्याकडे आला आहात. संजय कदम, अद्वैत हिरे हेही आपल्याकडे आले, असे ठाकरे यांनी नमूद केले.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जात आहोत. मी काँग्रेस फोडत नाही. अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला, शिवसैनिकांनी मेहनत घेतली. पण अमरावतीत आपण काँग्रेसला उमेदवार दिला. एकजुटीने लढल्याशिवाय समोरच्या वृत्तीचा आपण पराभव करू शकत नाही, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी आपल्या मित्रपक्षाला दिला.

मैदानात वाजणारे फटाके, त्यांच्या बुडाखाली वाजल्याशिवाय राहणार नाहीत

फटाकेसुद्धा शिवसैनिकांसारखे आहेत. एकदा पेटले की ऐकतच नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांना कोणी पेटविण्याचा प्रयत्न करू नये. कारण, मैदानात वाजणारे फटाके, त्यांच्या बुडाखाली वाजल्याशिवाय राहणार नाहीत, असाही इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT