Ulhasnagar Crime News : ‘पैशांचा पाऊस पाडतो’, तसेच जमिनीखालील गुप्तधन काढून देतो, असे आमिष दाखवत अघोरी विद्येच्या नावाखाली एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे.
विशेष पूजेच्या नावाखाली चार लाख रुपये रोख आणि सहा तोळे सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या प्रकरणी हिललाइन पोलिसांनी बाब्बू गुरू, पम्मी गुरू, गणेश पवार, गीता जाधव यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रेखा सुनील भोईर यांच्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये गीता जाधव यांच्या माध्यमातून त्यांची बाब्बू गुरू यांच्याशी ओळख झाली. घरातील अडचणी दूर करण्यासोबतच जमिनीखाली असलेले गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष (Crime) त्यांना दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, 4 जानेवारी 2026 रोजी गुप्तधन मिळवण्यासाठी विशेष पूजा करण्यात आली. या पूजेसाठी भोईर यांच्याकडून चार लाख रुपये रोख आणि सहा तोळे सोन्याचे दागिने (Gold robbery) घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पूजेनंतर घरातील देवस्थानाजवळील जमिनीत काही पूजेचे साहित्य पुरण्यात आले. हे साहित्य बाहेर काढल्यास कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
मात्र, अनेक दिवस उलटूनही सांगितल्याप्रमाणे ‘पैशांचा पाऊस’ पडला नाही किंवा गुप्तधन मिळाले नाही. त्यानंतर भोईर यांनी आरोपींकडे दिलेले पैसे आणि सोन्याचे दागिने परत मागितले. मात्र, पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने अखेर त्यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
भोईर यांच्या तक्रारीवरून हिललाइन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपींनी तक्रारीतील आरोप फेटाळले आहेत. कोणतेही पैसे किंवा सोन्याचे दागिने घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे असून, वैयक्तिक वादातून आपली बदनामी केली जात असल्याचा प्रतिदावा आरोपींकडून करण्यात आला आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील आरोपांची सत्यता, आर्थिक व्यवहार तसेच पूजेच्या नावाखाली नेण्यात आल्याचा दावा केलेल्या रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.